वैजापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी 10 हजार अग्रीम ; महागाई थकबाकी व वेतन वाटप

वैजापूर,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर नगरपरिषदेच्यावतीने दिवाळी सणासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अग्रीम, महागाई थकबाकीची रक्कम, ऑक्टोबर महिन्याचे वेतन व दोन ड्रेस कपड्याचे वाटप शुक्रवारी करण्यात आले.

पालिकेच्या फुले-आंबेडकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी होत्या. या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ व गणवेश वाटप करण्यात आले. सणाचे अग्रिम प्रत्येकी दहा हजार प्रमाणे 13 लक्ष रुपये, महागाई थकबाकी 12 लक्ष रुपये, आक्टोबर महिन्याचे वेतन 93 लाख रुपये तसेच सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन ड्रेस व महिला सफाई कर्मचार्‍यांना दोन साड्या. तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना दोन ड्रेसचे वाटप यावेळी करण्यात आले. नगरसेवक ईम्रान कुरेशी हे उमरा करुन आल्यामुळे त्यांच्या सत्कारही यावेळी करण्यात आला. 

कार्यक्रमाचे महत्व व स्वच्छता अभियान विषयी मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी माहिती दिली. नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी व  उपनगराध्यक्ष साबेरखान अमजदखान यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पालिकेतील भाजप गटनेते दशरथ बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेना गटनेते प्रकाश पाटील चव्हाण, नगरसेवक उल्हास ठोंबरे, राजूसिंग राजपूत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व  कर्मचारी उपस्थित होते.