‘विनायक’ साखर कारखाना सुरू करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार – जयहिंद शुगरचे गणेश माने यांचे आश्वासन

वैजापूर, ९ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील  विनायक सहकारी साखर कारखाना येथे महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.09) झाला. या कार्यक्रमास  जय हिंद शुगर मिलचे संस्थापक गणेश माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  

Ganesh Mane founder of Jaihind Sugar Mill

या प्रसंगी बोलताना माने यांनी विनायक सहकारी साखर कारखाना लवकरच चालू करू असे आश्वासन दिले.  ते म्हणाले की, एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी हजारो हात लागतात पण ती बंद पाडण्यासाठी एक दोन हातच पुढे सरसावतात आणि त्यांना काही लवकर उठण्याची ही गरज पडत नाही ते लेट उठून त्यांची विकृत प्रवृत्ती समाजात पसरवतात आणि ती गोष्ट बंद पडतात पण त्या एक दोन लोकात  आपण न जाता आपण विनायक सहकारी साखर कारखाना कसा लवकरात लवकर चालू होईल याकडे प्रयत्न करू या. निश्चितच येणाऱ्या काळात मी हा कारखाना चालू करेल. मी सोलापूरहून वैजापूर खंडाळ्यापर्यंत एकदम व्यवस्थित आलो पण खंडाळ्याच्या पुढे मात्र मी आस्तव्यस्त झालो. पण ज्यावेळेस मी कारखान्याकडे टर्न मारला त्यावेळेस मला तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर दिसले आणि माझ्या जीवात जीव आला आणि मग मी माझ्या कार्यकारी संचालक शिंदे यांना म्हणालो की, आपण आता या ठिकाणी धैर्याने उभे राहून निश्चितच कितीही काम असले तरी विनायक कारखाना चालू करू. असे सांगून आपण सर्वांनी मला या कामात मदत करावी जेणेकरून मी ह्या कारखान्याला परत चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करीन निश्चितच हा कारखाना येणाऱ्या काळात मी लवकर चालू करेल.

 या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनीही  यावेळी गणेश माने यांना आश्वासन दिले की, मी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे मिटींग लावून आपल्याला सहकार्य करेल तसेच शेतकरी नेते चंद्रकांत कटारे यांनीही त्यांच्या भाषणात सांगितले की गणेशजी आपण कुठलीही चिंता करू नका तालुक्यातील सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी उभा करेल आणि निश्चितच तुम्हाला कुठलेही वैजापूर मधील हात त्रासदायक  ठरणार नाही. आम्ही सर्व या कारखान्याला तालुक्याचा आत्मा मानतो आणि हा आत्मा जर तुम्ही चालू करत असाल तर तुम्ही सांगाल त्यावेळेस सर्व शेतकरी सभासदांची ताकद तुमच्या साठी उभी करू.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकरराव पवार, मार्केट कमिटीचे संचालक सुभाष पाटील आव्हाळे, शिवक्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील बोडखे, सोमनाथ मगर अरुण मलिक, जय हिंद शुगरचे कार्यकारी संचालक शिंदे यांच्यासह परिसरातील हजारो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात ह. भ. प. मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने सांगता झाली.