रोटेगाव रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा – रेल्वे प्रवासी सेना व व्यापारी आघाडीचे निवेदन

वैजापूर, ९ डिसेंबर / प्रतिनिधी :-रोटेगाव रेल्वेस्थानकावर नगरसूल – तिरुपती एक्स्प्रेस, नांदेड- पुणे एक्स्प्रेस, नगरसूल- नरसापूर एक्स्प्रेस व जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना व व्यापारी आघाडीने एका निवेदनाद्वारे केली आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अरुणकुमार जैन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोटेगाव रेल्वेस्टेशन ता.वैजापूर येथून शिक्षण व व्यापारासाठी  विद्यार्थी व व्यापारी औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच मुंबई व पुणे येथे व्यापारासाठी ये-जा करतात. शेतकरी, कामगार, व्यापारी, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांच्या जाणे-येण्यासाठी नगरसुल तिरुपती एक्सप्रेस, नांदेड पुणे एक्सप्रेस, नगरसोल- नरसापुर एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांना रोटेगांव रेल्वेस्टेशनला थांबा देण्यात यावा. ज्यामुळे या सर्वांची जाण्या-येण्याची सोय होईल व तालुक्यातील व्यापार वाढीसाठी ते पूरक ठरेल. तसेच रोटेगाव रेल्वे स्टेशन येथे इंडिकेटर्स नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी व लहान बालकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो, विविध कर्मचारी, विद्यार्थी, सामान्य प्रवासी, शेतकरी या सर्वांना त्यांच्या दुचाकी चारचाकी वाहने लावण्यासाठी अधिकृत पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येतात तसेच रात्री बेरात्री प्रवास करणाऱ्या माता-भगिनींना, प्रवाशांना रेल्वे स्टेशन परिसर, प्लॅटफॉर्म आणि बाहेरील परिसर येथे पर्याप्त लाईट व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे रेल्वे स्टेशन व आसपासच्या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये करिता रेल्वे प्रशासनाने तेथे सीसीटीव्हीची व्यवस्था करावी असेही या निवेदनात  नमूद करण्यात आले आहे. 

भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे सुरेंद्र संचेती, विनोद भाटिया, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस निलेश पारख, हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले, नगरसेवक दशरथ बनकर, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, गोकुळ भुजबळ, शैलेश पोंदे, दामोदर पारीक, गौरव दोडे, गिरीश चापानेरकर, ज्ञानेश्वर आदमाने, धोंडीरामसिंह राजपूत, रामचंद्र पिल्दे, राजेंद्र तोष्णीवाल, हबीबभाई,अजय आहेर आदींनी दक्षिण- मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अरुणकुमार जैन यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.