पिस्तुलाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची रोकड लंपास,चौघांच्या मुसक्या नांदेड पोलिसांनी आवळल्या

नांदेड,२५ मे /प्रतिनिधी :- भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची रोकड लंपास करणार्‍या चौघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला यश मिळाले आहे. या चौघांकडून सुमारे चार लाख रोकड व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
नवा मोंढा येथील योगेश ट्रेडिंग कंपनीचे मालक ओम बोरलेवार हे 10 मे रोजी सुमारे 15 लाख रुपयांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी घेऊन निघाले होते. चिखलवाडीकडे जाणार्‍या हिंगोली गेट उड्डाणपुलावर त्यांचा पाठलाग करणार्‍या दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवले व पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्याजवळील 15 लाख रुपयांची बॅग लंपास केली. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात वजिराबाद पोलिसांना अपयश येत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी काही खबरे पेरले; त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यात आली. बोरलेवार यांच्या दुकानात काम करणार्‍या उमेश यादव यानेच ही माहिती आपल्या मित्रांना दिली व लुटीचा प्रकार घडला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. यादव याने सोनु हिरालाल रिंदकवाले याच्यामार्फत टीप दिली. त्यानंतर ही लुटमार झाली. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी शेख बाबू ऊर्फ आवेज याच्यासह चौघाला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांची रोकड व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्या प्रकरणात आणखी दोन आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यवाहीत एका गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला.

——————————————————————-

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तात व्यस्त आहेत, त्याचाच फायदा घेऊन चोरटे लुटमारीच्या घटना घडून आणत आहेत, असे असले तरी पोलीस प्रशासनाने रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना यापूर्वीच जेरबंद केले आहे. दिवसा तसेच रात्रीची गस्त वाढवण्यावर भर देण्यात आला असून कोणताही संशय आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. लुटमारीच्या घटनेतील फरार दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येईलद्वारकादास चिखलीकर ,स्थानिक गुन्हा पोलीस निरिक्षक, नांदेड


नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरी, दरोडा, लुटमारीच्या घटना वाढल्या असल्या तरी गुन्हा उकल होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसाहतीमधून होत असली तरी त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. लुटमारीच्या घटनेतील अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांची तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.