महिलेला दीड लाखांना गंडा ,आरोपी महिलेने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद ,२५मे /प्रतिनिधी :-
आपल्या युटूव्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुपटीने परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेला दीड लाखांना गंडा घातल्या प्रकरणी आरोपींपैकी एका महिलेने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एम. भोसले यांनी फेटाळला. जागृती महेश देसाई (रा. शहाड, कल्याण जि. ठाणे) असे महिला आरोपीचे नाव आहे.
समर्थनगरातील तेजस्विनी सुधाकर गायकवाड (३८) यांनी मार्च २०१८ मध्ये वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीवरुन युटूव्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी कंपनीचा सीएमडी असल्याचे सांगून सतीश तिवारी, जागृती देसाई, सुनिता करमकर, नवलकिशोर पांडे आणि कमल श्रीवास यांनी गायकवाड यांना आपल्या कंपनीत पैसे गुंतविल्यासाठी दामदुपटीचे आमिष दाखविले. त्यावेळी गायकवाड यांनी पहिल्यांदा दोन आयडी तयार करत बारा हजार सहाशे रुपये गुंतविले होते. त्यानंतर २० आयडी तयार करत एक लाख ६० हजार असे एकुण एक लाख ७२ हजार सहाशे रुपये गुंतविले होते.
दरम्यान, सुरूवातीच्या काळात कंपनीने गायकवाड यांना १६ हजार दोनशे रुपये परतावा दिला. परंतु, त्यानंतर तिवारी याने परतावा देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली. तसेच तिवारी याने गायकवाड यांना दिलेले धनादेशही वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान गुन्‍ह्यात अटक होऊ नये यासाठी आरोपी जागृती देसाई हिने अटकपूर्व जामीनीसाठी अर्ज सादर केला असता, अतिरिक्त जिल्‍हा सरकारी वकील सतिश मुंडवाडकर यांनी आरोपी जागृती हिने फसवणूक करून मिळवलेल्या रक्कमेतून स्थावर किंवा जंगम मालमत्‍ता खरेदी केली आहे का याचा तपास करणे ओह. आरोपींनी अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक केली याचा तपास करणे आहे. गुन्‍ह्यातील इतर आरोपींचा शोध घेवून त्‍यांना अटक करणे असल्याने आरोपीच्‍या जामीनीला विरोध केला. सुनावणी अंती न्‍यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.