बौध्‍द भिक्खूंसह उपासकांना जातीवाचक शिवीगाळ व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच ऊसतोड कामगारांना एक वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२३ डिसेंबर /प्रतिनिधी:- वैजापुरात भोजनदान कार्यक्रमासाठी जाणाऱ्या  बौध्‍द भिक्खूंसह उपासकांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच ऊसतोड कामगारांना एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी ठोठावली.

ताराचंद सेवा राठोड (४५), सुधाकर ताराचंद राठोड (२३), सुरेश सेवा राठोड (३५), जालम सेवा राठोड (६०) आणि जीवन ऊर्फ दादू जालम राठोड (२२, सर्व रा. मुंडवाडी तांडा ता. कन्‍नड) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात भिक्खू गुणानंदजी (५१, रा. जम्बूदिप बुध्‍दविहार, नावडी ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २ जानेवारी २०१५ सकाळी आठ वाजेच्‍या सुमारास फिर्यादी व त्‍यांचे सहाकरी भदंत सारीपुत्र, भदंत धम्मसेवक, भदंत मनायु, ज्ञानरत्‍न, उपासक दिनकर हिवराळे आणि सात उपासिका महिला हे भोजनदानाच्‍या कार्यक्रमासाठी वाकला (ता. वैजापुर) येथे टाटा सुमो गाडीने जात होते. सकाळी साडेअकरा वाजेच्‍या सुमारास मुंडवाडी मार्गे जेहुरलाजात असतांना नाल्यावरील एका पुलासमोर ऊस वाहतूक करण्‍यासाठी असलेल्या बैलगाड्या रोडवर उभ्‍या केलेल्या होत्या. त्‍यामुळे फिर्यादीसह गाडीतील इतरांनी बैलगाड्या बाजुला घेण्‍यासाठी तेथे उपस्थित ऊसतोड कामगारांना विनंती केली. मात्र त्‍यातील एका कामगाराने तुमच्‍या बापाचा रस्‍ता नाही, गाड्या रस्‍त्‍यातून हलणार नाही असे म्हणत फिर्यादी व त्‍यांच्‍या इतर सहकाऱ्यांना  अर्वाच्य  भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. त्‍यानंतर ऊसतोड कामगाराने भदंत धम्मसेवक यांच्‍या तोंडावर ठोसा मारुन जखमी केले. त्‍यामुळे फिर्यादीसह इतर सहाकऱ्यांनी ऊसतोड कामगाराला समजाविण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र ऊसतोड कामगाराने साथीदारांना आवाज देवून बोलावून घेतले. २०-२५ जण हातात लाठ्या-काठ्या व कोयते घेवून आले. त्‍यांनी फिर्यादीसह भदंत धम्मसेवक, सारीपुत्र व गाडीतील सर्व पुरुष व महिला उपासकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. तसेच महिलांपैकी एकीची साडी ओढुन तिचा विनयभंग केला. या प्रकरणात कन्नड शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्‍याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता कैलास पवार (खंडाळकर) यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम १४३ अन्वये तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, कलम १४७ अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, आणि कलम ३२४ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन सहायक निरीक्षक व्‍ही.एम. यमपुरे, सहायक फौजदार जे.आर. पठाण आणि हवालदार व्हि.व्‍ही. घाद‍गीन यांनी काम पाहिले.