वैजापूर शहरात धूमस्टाईलने दुचाकीवरून 40 हजाराची सोन्याची पोत हिसकावली

वैजापूर, ८ डिसेंबर / प्रतिनिधी :-भरदिवसा धुमस्टाईल दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी  महिलेच्या गळ्यातून 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना 06 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील स्टेशन रस्त्यावर घडली. भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांत घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक्षा विजय जोशी (रा.मारवाडी गल्ली) ही महिला मंगळवारी सायंकाळी शहरातील स्टेशन रस्त्यावरील एका दुचाकी शोरूम समोरून  पायी जात होत्या.  याचवेळी एका काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत  हिसकावून नेली. यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. परंतु काही समजण्यापूर्वीच चोरटयांनी घटनास्थळाहुन धूम ठोकली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.