वैजापूर येथे शिवसेना नगरसेविकेच्या मुलाला भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

वैजापूर,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- निवडणुकीच्या चर्चेत शिवीगाळ केल्याचे म्हणत एकाच्या डोक्यात फायटर मारून जखमी केल्याची घटना येवला रोडवरील सरकारी दवाखान्यासमोर शनिवारी रात्री घडली. यातील जखमी हा सेना नगरसेविकेचा मुलगा तर मारहाण करणारे भाजपा पदाधिकारी आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव दोडे, आशिष सरोदे व कृष्णा क्षीरसागर ( तिघे रा. टिळक रोड, वैजापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश ज्ञानेश्वर टेके हा शनिवारी रात्री त्यांच्या हॉटेलमध्ये बसलेला होता. तेथे गौरव दोडे हा आशिष व कृष्णासोबत आला व त्याने तू कृष्णासोबत इलेक्शनची चर्चा करतांना मला शिवीगाळ का केली अशी विचारणा त्याने योगेशला केली. त्यावर योगेशने मी त्याच्याशी फक्त चर्चा केली. तुझ्याबद्दल काही वाईट शब्द बोललो नसल्याचे योगेश समजावून सांगत असताना गौरवने त्याच्या डोक्यात फायटर मारून जखमी केले. त्यामुळे खाली पडलेल्या योगेशला या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परत काही बोलला तर हातपाय तोडून टाकू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलचे कामगार मनोज सोळसे, सचिन तुरे, लक्ष्मण त्रिभुवन व असलम कुरेशी यांनी योगेशला तिघांच्या तावडीतून सोडविले. या प्रकरणी योगेश ज्ञानेश्वर टेके यांच्या तक्रारीवरून गौरव दोडे, आशिष सरोदे व कृष्णा क्षीरसागर यांच्यावर वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे