वैजापूर येथे व्यापारी संकुलात आढळला मृतदेह

वैजापूर, ८ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरील ( मुलांची ) व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर एका 42 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (ता.07) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदरील इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?  हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याचा मृत्यू  हा ह्रदयविकाराच्या धक्क्याने  झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शहरातील मध्यवर्ती भागातील संकुलात हा मृतदेह आढळून आल्याने व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे. पंढरीनाथ भिका वाणी (42 रा.वानवडी, वैजापूर ) असे मृताचे नाव आहे.

शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या एका व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने परिसरात नागरीकांमध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना  दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी या परिसरात चौकशी केली. त्यानंतर सदरील मृतदेह शहरातीलच पंढरीनाथ वाणी यांचा असल्याचे पोलिसांना  समजले. याबाबत पोलिसांनी पंढरीनाथ वाणी यांच्या कुटुंबियांना माहिती कळविली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वाणी यांचा मृत्यू हा ह्रदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे  करीत आहेत.