विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ : 55 हजार रुपये किमतीचे पशुधन व जनरेटरची चोरी

वैजापूर, ७ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत चार वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालत गाय, बैल व जनरेटर असा एकूण 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे रब्बीच्या हंगाम असल्याने शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावमुळे घर सोडून रात्रीच्या सुमारास शेतात पिकाना पानी देण्यासाठी जावे लागते. मात्र,चोरट्यांच्या धुमाकूळमुळे वाड्या वस्त्यावर चोरांची दहशत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्भव कचरू डोंगरे (रा. लाडगाव) हे शेतीव्यवसाय करून उपजीविका भागवितात. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपून ते झोपी गेले. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ते लघुशंकेसाठी घरातून बाहेर पडले. यावेळी घरासमोर दोरखंडाने बांधलेले गायीचे दोरखंड कापून चोरट्यांनी गाय चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय गावतीलच प्रदीप निंबाळकर यांच्या घरासमोर बांधलेले बैल व गाय तर तालुक्यातील सावखेडगंगा येथील शेतकरी सुनील खटाणे यांचा बैल चोरट्यांनी चोरून नेला. याच रात्री घडलेल्या चौथ्या एका चोरीच्या घटनेत रविंद्र उपाध्याय यांच्या मालकीच्या जनरेटरचे आर्मिचर चोरट्यांनी चोरून नेले. या चारही चोरीच्या घटनेबाबत उद्धव डोंगरे यांनी वीरगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून 55 हजार रुपये किंमतीचे पशुधन व 20 हजारांचे जनरेटरचे आर्मिचार असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.