सेवानिवृत्‍त क्रीडा उपसंचालक राजकुमार महादवाडला अटक

औरंगाबाद / प्रतिनिधी
बनावट कागदपत्राआधारे शासकीय नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुध्द तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या 188 जणांविरुध्द दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने  रविवारी दि.22 रात्री आणखी दोघांना अटक केली. सेवानिवृत्‍त अधिकारी राजकुमार दत्‍तात्रय महादावाड (59) आणि क्रीडा  अधिकारी भाऊराव रामदास वीर (52, रा. ताजनगर, शेवगाव जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि 15 मार्च रोजी अटक करण्यात आलेला आरोपी अंकुश राठोड (35, रा. पारेगाव, मानेगाव ता.जि. जालना) या दोघांना शनिवारपर्यंत दि.27 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे/तांबडे यांनी सोमवारी दिले.
तर गुन्ह्यात 19 मार्च रोजी अटक करण्यात आलेला आरोपी तथा गेवराई विभागतील दप्‍त कारकून शंकर शामराव पतंगे (46, रा. न्यू. एसटी कॉलनी) आणि सेवानिवृत्‍त अधिकारी राजकुमार दत्‍तात्रय महादावाड (59) या दोघांना बुधवारपर्यंत दि.24 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले.
महाराष्ट्र अँम्युचुअर असोसिएशनच्या वतीने सन 1988 ते 2005 या काळात 19 वर्षे वयोगटाखालील उमेदवारांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या नव्हत्या. तर सन 1997 ते 2005 या काळात ट्रॅम्पोलिन व टंबलिग क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिडा स्पर्धेच्या बनावट प्रमाणपत्राआधारे पाच टक्के आरक्षण मिळविण्यासाठी उमेदवार खेळाडूंनी सन 2016 ते 2019 या काळात ट्रॅम्पोलिन व टंबलिग या क्रिडा स्पर्धेतील सहभागाचे अर्हता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रस्तावासोबतच मुळ निकालात फेरफार केला. तसेच ट्रॅम्पोलिन संघटनेचे सचिव राजेंद्र पठाणीया यांच्या खोट्या व बोगस सह्या असलेले प्रतिज्ञापत्र, बनावट प्रवेश अर्ज व फॉर्म प्रस्तावासोबत सादर केले. या कागदपत्राआधारे उमेदवार खेळाडूंनी पाच टक्के आरक्षण अंतर्गत अर्हता प्रमाणपत्र प्राप्त केले. या बनावट कागदपत्राआधारे अर्हता प्रमाणपत्रांचा विविध शासकीय कार्यालयात नोकरीसाठी उपयोग करण्यात आला. तसेच बनावट कागदपत्रांआधारे काही उमेदवारांनी शासकीय कार्यालयात नोकरी मिळवून उर्वरीत उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर करुन शासनाची दिशाभूल केली. त्याप्रकरणी विभागीय उपसंचालक उर्मिला गणपतराव मोराळे यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात 188 उमेदवार खेळाडूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, गुन्हे शाखा उपायुक्त रविंद्र साळोखे, गुन्हे  शाखा निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, जमादार सोनवणे, गवळी, शिरोटे, पाटील आणि व्हावळ आदींनी केली.