पोलिस निरीक्षकावर चाकूने प्राण घातक हल्ला:नियमित जामीन  विरोधात औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज

औरंगाबाद, ​५​ डिसेंबर  / प्रतिनिधी :-कर्तव्‍यावर असलेल्या पोलिस निरीक्षकावर चाकूने प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी सत्र न्‍यायालयाने आरोपीला दिलेल्या नियमित जामीन  विरोधात औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल करण्‍यात आला आहे. अर्जावर झालेल्या प्राथमिक सुनावणीनंतर न्‍यायमूर्ती एस.जी. मेहरे यांनी  राज्य शासनासह आरोपीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी ३ जानेवारी रोजी होणार आहे.

जिन्‍सी पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक व्‍यंकट केंद्रे हे २१ जून रोजी कर्तव्‍यावर असताना रात्री साडेआठ वाजेच्‍या सुमारास आरोपी तथा स्वेच्छा  निवृत्ती घेतलेला आरोपी अंमलदार शेख मुजाहीद शेख जमादार याने अचानक अश्लिल शिवीगाळ करून केंद्रे यांच्‍या पोटात चाकू भोसकला. यावेळी तेथे उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी  आरोपीला जागेवर पकडत त्‍याच्‍या हातातून चाकू हिसकावून घेतला. या प्रकरणात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात आरोपी विरोधात भादंवी कलम ३०७, ५३५, ३३२, २९४ अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

निरीक्षक केंद्रे यांच्‍यावर तब्बल २१ दिवस उपचार सुरु होते. त्‍या दरम्यान आरोपीने नियमित जामीनसाठी अर्ज सादर केला असता तो नाकरण्‍यात आला. गुन्‍ह्याचा तपासपूर्ण झाल्यावर तपास अधिकाऱ्यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्‍यानंतर पुन्हा आरोपीने नियमित जामीनसाठी अर्ज दाखल केला असता सत्र न्‍यायालयाने दोन व्‍यक्तींच्‍या भांडणातून हा गुन्‍हा घडल्याचे नमुद करत जामीन मंजुर केला. या विरोधात केंद्रे यांनी अॅड. सिध्‍देश्‍वर ठोंबरे यांच्‍या वतीने व शासनाच्‍या वतीने खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल करुन आरोपीचा जामीन रद्द करावा अशी विनंती करण्‍यात आली.