सामान्य माणसांच्या प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज -राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती संभाजी शिंदे

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :- हायप्रोफाईल खटल्यांची अधिक चर्चा होऊन अशा खटल्यात न्यायसंस्थेचा जास्त वेळ जातो. उलट सामान्य माणसांच्या प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज आहे. कारण न्यायसंस्था आधी पक्षकारांसाठी असून त्यात न्यायाधीश, वकील नंतर आहेत, असे प्रतिपादन राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती संभाजी शिंदे यांनी सत्कार सोहळ्यात केले.

राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती आणि औरंगाबाद खंडपीठात न्यायदान केलेले न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांचा औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ वकील संघातर्फे शुक्रवारी सत्कार करण्यात आला. खंडपीठ ग्रंथालयाच्या वाचन कक्षात सायंकाळी शिंदे यांच्या तैलचित्राचे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांनी अनावरण केले. त्यानंतर अतिथी हॉटेलच्या सभागृहात न्यायमुर्ती शिंदे आणि श्रीमती ऊर्मिला शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायमुर्ती अभय ओक, न्या. प्रसन्नकुमार वराळे, न्या. संजय गंगापूरवाला, न्या. आर. व्ही. घुगे, अॅड. वसंतराव सोळंके, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी, उपाध्यक्ष संदीप आंधळे, सचिव सुहास उरगुंडे, निमा सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. होळ (ता. अंबाजोगाई) येथील शेतकरी कुटुंबातील शिंदे यांनी मुख्य न्यायमुर्ती पदापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

‘करोना काळात न्यायदान प्रक्रिया आव्हानात्मक होती. मात्र, न्या. अमजद सय्यद आणि न्या. संभाजी शिंदे यांनी त्यातून मार्ग काढला आणि पुढील दोन वर्षे न्यायदान सोपे झाले. न्या. संभाजी शिवाजीराव शिंदे यांच्या नावात ट्रिपल ‘एस’ आहे. सिम्पलिसीटी, सिन्सिअॅरिटी आणि स्माईल हे तीन ‘एस’ आहेत, असे न्या. दीपांकर दत्ता म्हणाले.

परिश्रम करण्याची तयारी असल्यास उच्च पदापर्यंत पोहचता येते. माझे आजोबा ज्ञानेश्वरीचे पारायण करीत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. कोणत्याही पदावर गेला तरी आपली मुळं विसरायची नाही ही आई-वडीलांची शिकवण कायम सोबत आहे, असे शिंदे म्हणाले.

अॅड. प्रज्ञा तळेकर, राम बिरादार, राजेंद्र देशमुख, प्रवीण मंडलिक यांनीही विचार मांडले. बाळासाहेब मगर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विविध न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, वकील उपस्थित होते.