ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) संस्थेने ऑरिक येथे ऑटो टेस्टिंग हब प्रकल्प स्थापन करावा: सीएमआयएचा पाठपुरावा

औरंगाबाद, ​३०​ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ही भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली सर्वोच्च ऑटोमोटिव्ह  प्रमुख संशोधन, चाचणी आणि प्रमाणन संस्था आहे. सप्टेंबर महिन्यात एआरएआय संस्थेद्वारे एका महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 600 ते 700 एकर जमिनीकरिता निविदा मागविल्या होत्या.  ऑटोमोबाईल टेस्टिंग हबसह इतर प्रकल्प या जागेत विकसित करण्यात येणार असून हा प्रकल्प ऑरिक – बिडकिन येथे करावा या करिता सीएमआयए मार्फत पाठपुरावा करण्यात आला असून, या संदर्भात केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच एआरएआय संचालक यांना पत्र पाठवण्यात आले. ऑरीकने याविषयी सविस्तर अहवाल सादर केला असून त्यांच्या संचालक मंडळ आणि एआरएआय यांच्यामध्ये पुणे येथे सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली.

ऑरीकमध्ये हा मोठा प्रकल्प आल्यास वाहन क्षेत्रातील सर्व कंपन्या चाचणी, आणि प्रमाणन करण्यासाठी येथे येतील याचा मोठा फायदा औरंगाबाद विभागातील ऑटोमोबाईल क्षेत्राला होईल अशी माहिती त्यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना मानद सचिव अर्पित सावे म्हणाले की या संस्थेचा प्रकल्प पुण्यापासून ३००किमी अंतरावर ६००-७०० एकर , जी शक्यतो औद्योगिक क्षेत्रात आयताकृती जगते ३.३ किमी लांबीचा आणि ८००मी रुंदी  जागेच्या शोधात आहे. या संपूर्ण अपेक्षा ऑरीक पूर्ण करत असून, या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ऑरिकचा विचार करावा यासाठी सीएमआयए पाठपुरावा करत आहे. नव्याने होऊ घातलेला औरंगाबाद – पुणे एक्स्प्रेसवे बिडकीन औद्योगिक वसाहती जवळून जात आहे त्यामुळे पुण्यातील एआरएआय संस्थेचे अंतर दोन तासात कापले जाऊ शकते. १०००० एकर जागेत विकसित होत असलेल्या भारतातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक वसाहतीत जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहे.  औरंगाबाद वाहन उद्योग क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून मागील काही दशकामध्ये नावारूपास आले आहे. मोठ्या उद्योगासह पुरवठा साखळी विकसित झाली असून वाहन क्षेत्रातील महत्वपूर्ण संस्थेने प्रकल्पासाठी ऑरिकचा विचार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

एआरएआयने प्रकल्पासाठी व्यक्त केलेल्या अपेक्षा
पुण्याच्या आसपास  300 किमीच्या आत अंतरावर, शक्यतो औद्योगिक क्षेत्रात सुलभ रस्त्यासह.  अवजड व्यावसायिक वाहनांसाठी सुविधा उपलब्ध असाव्यात. वीज केंद्र जवळ, आणि औद्योगिक पाणी पुरवठ्याची तरतूद  सुविधा असाव्यात
• क्षेत्र – 600-700 एकर
• जागेची लांबी – 3.3 किमी किमान
• जागेची रुंदी – किमान 800 मी
• सपाट जमीन – 15 ते 20 मीटरपेक्षा कमी उतार
• हार्ड मुरुम, खडकाळ रिफिल केलेली माती.
• वनस्पती गवत, झुडुपे आणि मोठी झाडे नाहीत
• जलस्रोत एमआयडीसी, पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून जलस्रोत – 2 ते 3 एमएलडी उपलब्धता असावी
• महावितरणच्या सबस्टेशनची पॉवर – किमान 11kV
• आजूबाजूचा परिसर प्राधान्याने शेती किंवा औद्योगिक
जमीन औद्योगिक क्षेत्र असावा जो शहर किंवा गावाजवळील असावा
• कमी पाऊस पडणे, शुष्क क्षेत्र असावे.