व्यावसायिकांकडून १० लाख ४१ हजार ६३० रूपये घेऊन त्या रक्कमेचा अपहार: सेल्समनला अवघ्‍या काही तासात बेड्या

औरंगाबाद, ​३०​ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कंपनीच्या सेल्समनने परस्पर व्यावसायिकांकडून १० लाख ४१ हजार ६३० रूपये घेऊन कंपनीत जमा न करता त्या रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार सोमवारी दि.२८ उघडकीस आला. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी गंडा घालणारा सेल्समन प्रशांत दिलीप रूपेकर (३०, रा. शेंद्रा) याला गुन्‍हा दाखल होताच अवघ्‍या काही तासात बेड्या ठोकल्या. आरोपीला २ डिसेंबरपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी मंगळवारी दि.२९ दिले.

प्रकरणात हिरासिंग त्रिलोकसिंग सेठी (५२, रा. एन-१, सिडको) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीच्‍या दोन कंपन्या असून त्‍यातील एक मैत्री स्पिरीट प्रायव्हेट लिमीटेड नावाची कंपनी ही चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. आरोपी दिलीप हा या कंपनीत सेल्समन म्हणुन कार्यरत होता. त्‍याच्‍याकडे मद्य व वाईन व्यावसायिकांना  मद्य विक्री करणे व त्‍यांच्‍याकडून येणारे पैसे घेवून कंपनीतील कॅशीयरकडे जमा करण्‍याचे काम होते. दिलपने जयभवानी हॉटेलच्‍या मालकाकडून कंपनीच्‍या प्रॉडक्टच्या   बदल्यात दिलेले एक लाख रुपये कंपनीत जमा न करता ते स्‍वत: खर्च केले. ४ नोव्‍हेंबर रोजी बाब कंपनीचे मॅनेजर दर्शन भाकरे यांच्‍या निदर्शनास आली. त्‍यावेळी आरोपीच्‍या पत्‍नीने विनवण्‍या केल्याने फिर्यादीने आरोपी विरोधात तक्रार दिली नाही. फिर्यादीने आरोपीचे सर्व व्‍यवहार तपासले असता, त्‍याने विक्री केलेल्या प्रॉडक्टचे १० लाख ४१ हजार ६३० रुपये व्यावसायिकांनी  दिले होते. मात्र आरोपीने ते पैसे स्‍वत:कडे ठेवून घेतल्याचे समोर आले. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील सुप्रिया दास यांनी आरोपीने अपहार केलेली रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी अपहार केला आहे का, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.