घरावर भिंत कोसळून महिलेचा मृत्‍यु:घरमालक महिलेला एक महिन्‍याची सक्तमजुरी

औरंगाबाद, ​३०​ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-इमारतीचे बांधकाम सुरु असताना इमारती लगत असलेल्या पत्र्याच्‍या घरावर भिंत कोसळून महिलेचा मृत्‍यु झाला होता. या प्रकरणात घरमालक महिलेला एक महिन्‍याची सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. छल्लाणी यांनी ठोठावली.

हौसाबाई हरी साळवे (६४, रा. रमानगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे न्‍यायालयाने ठोठावलेल्या दंडाच्‍या रक्कमेपैकी २५ हजार रुपये नुकसान भरापाई म्हणुन मयत महिलेच्‍या नातेवाईकांना आदेशात म्हटले आहे.

या प्रकरणात मयत विमलबाई प्रभाकर दाभाडे यांचा मुलगा ज्ञानेश्र्वर प्रभाकर दाभाडे (२८, रा. रमानगर) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादी व त्‍यांचे कुटूंब राहत असलेल्या घराच्‍या बाजुला आरोपी महिलेच्‍या इमारतीच्‍या दुसर्या मजल्याचे बांधकाम सुरु होते. बांधकामाचे मटेरिअल फिर्यादीच्‍या घरावर पडत असल्याने फिर्यादी व त्‍यांच्‍या कुटूंबियांनी आरोपीला काही उपाययोजना करण्‍याची विनंती केली होती. मात्र आरोपीने त्‍याकडे दुर्लक्ष केले. १ जून २०१८ रोजी फिर्यादीची आई घरात स्‍वयंपाक करित होत्‍या. त्‍यावेळी आरोपी महिलेच्‍या इमारतीची भिंत फिर्यादीच्‍या घरावर कोसळी. या घटनेत स्‍वयंपाक करणारी फिर्यादीची आई त्‍या भिंतीखाली दबुन गंभीर जखमी झाली. फिर्यादीच्‍या आईला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. उपचार सुरु असतांना ६ जून २०१८ रोजी फिर्यादीच्‍या आईचा मृत्‍यु झाला.या प्रकरणात उस्मानपुर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक राहुल चव्‍हाण यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्‍ही बाजुच्‍या साक्ष व पुराव्‍याअंती न्‍यायालयाने आरोपी महिलेला भादंवी कलम ३०४ (अ) अन्‍वये एक महिन्‍याची सक्तमजुरी आणि ३० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार सुरेश भागडे यांनी काम पाहिले.