कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी अवघे तीन महिने बाकी

शेतकऱ्यांसाठी थकीत रकमेत सुमारे 66 टक्के सवलत

औरंगाबाद,१२ जानेवारी / प्रतिनिधी :-  कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे 66 टक्के सवलत मिळविण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे.

          कृषिपंप वीज धोरणात येत्या मार्च 2022 पर्यंत चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत या योजनेत औरंगाबाद परिमंडलातील 91 हजार 731 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे. दरम्यान, थकबाकीमुक्तीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून गावोगावी जनजागृतीपर शेतकरी मेळावे व संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीजबिलाबाबत तक्रार किंवा शंका असेल, त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.  या योजनेत औरंगाबाद परिमंडलात आतापर्यंत कृषिपंपाच्या 2 हजार 918 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. तर चालू व थकीत वीजबिल भरण्यातून ग्रामपंचायती व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 33 टक्के असा एकूण 41 कोटी 14 लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. या निधीमधील वीज यंत्रणेच्या स्थानिक कामांसाठी आतापर्यंत 9 कोटी 75 लाख रुपये खर्चाचे 544 कामांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहेत.

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले व औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, जालना मंडलाचे अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण यांच्या पुढाकाराने औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये महावितरणतर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘एक गाव एक दिवस’ व ‘हर घर दस्तक’ या उपक्रमांचा एकत्रित चांगला परिणाम वसुलीत दिसून येत आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 91 हजार 731 शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण 60 कोटी 25 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना महावितरणकडून निर्लेखन, व्याज व विलंब आकार तसेच सुधारित थकबाकीत सूट अशी 353 कोटी 6 लाख रुपयांची सूट मिळाली आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ व सहभाग घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.