छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या महिला-20 च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग

G-२० परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधीनी घेतला शहराचा निरोप

छत्रपती संभाजीनगर,१ मार्च  / प्रतिनिधी :-येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी जी 20  अंतर्गत महिला 20 ची प्रारंभिक बैठक झाली. भारतीय नौदलातील महिला अधिकारी आणि सेवेतील वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या जोडीदारांनी त्यांचे अनुभव आणि भारतीय नौदलातील त्यांचा प्रवास यावेळी कथन केला. अडथळ्यांवर मात: असामान्य महिलांच्या कथा या संकल्पनेवर आधारित संवादाचे आयोजन केले होते. त्यात मनोगत व्यक्त करणाऱ्यांच्या शब्दातून आणि मनोभूमिकेतूनही भारतीय नौदलातील महिला सशक्तीकरण तसेच समावेशकतेचे प्रतिबिंब दिसत होते. प्रत्येकाकडे सांगण्यासारखे काही खास आणि अनोखे असे होते. 

उंचीच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि एक कुशल एअरक्रू बनण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल लेफ्टनंट कमांडर स्वाती भंडारी यांनी माहिती दिली. त्यांनी कार्यान्वयन आणि शोध तसेच बचाव मोहिमेतही भाग घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 2022 च्या महिला दिनी या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान केला आहे. सर्जन कमांडर शाझिया खान या स्त्रीरोग शस्त्रक्रियेतील तज्ञ आहेत. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आलेले अनुभव आणि नौकाविहार, नौकानयन तसेच नुकतीच केलेली राजस्थान कार रॅली या सर्वातून आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्यात झालेली मदत त्यांनी उलगडून सांगितली. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांनी,  प्रजासत्ताक दिन संचलनात एनसीसी तुकडीचा भाग होण्यापासून ते यंदा प्रजासत्ताक दिनी 144 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय नौदल तुकडीचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अभिमानाने कथन केला. लेफ्टनंट कमांडर तविशी सिंग या नौदलात जहाज उभारणी संदर्भातील कामे करतात. युद्धनौकांच्या जलावतरणपूर्व आणि वितरणाशी संबंधित कामे वेळेवर पूर्ण व्हावेत याची खातरजमा करण्यासाठी जहाज उभारणी कारखान्यातील कामाची देखरेख त्या कशी करतात याचे त्यांनी वर्णन केले. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रूपा, या दोन महिला अधिकारी सध्या आयएनएसव्ही तारिणी या जहाजावर दक्षिण अटलांटिकमध्ये नौकानयन करत आहेत आणि एका आशियाई महिलेकडून प्रथम प्रदक्षिणा करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांचे थेट येणे हा एक अद्भुत अनुभव होता. 

नौदल कल्याण संस्था (एनडब्लूडब्लूए) नौदल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जीवनसाथीद्वारे चालवली जाणारी संघटना आहे. या उपक्रमातील सुरुवातीच्या सदस्य दीपा भट यांनी या संघटनेच्या भूमिकेचे महत्व शेवटी विषद केले.

बदलत्या काळानुसार एनडब्लूडब्लूए देखील लिंग तटस्थता स्वीकारण्यासाठी विकसित झाली आहे. नौदलात कार्यरत जीवनसाथी कशी भूमिका बजावतात आणि नौदल आपली जबाबदारी पार पाडत असतानाही मागे असलेल्या कुटुंबांना आधार देणारे चांगले पाठबळ देणारे बंध राखून ते बळ देणारे म्हणून कसे काम करतात यावर त्यांनी प्रकाश टाकला. कुटुंबांची काळजी घेतली जाईल असा विश्वास आणि शक्ती ते प्रदान करतात.

G-२० परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधीनी घेतला शहराचा निरोप

छत्रपती संभाजीनगर– G-20 च्या अंतर्गत वुमन -20 या दोन दिवसीय परिषेदसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधीनी आज औरंगाबाद शहराचा निरोप घेतला.  काल  दि.28 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या विमानाने एकूण 16 महिला प्रतिनिधीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला तर आज उर्वरित प्रतिनिधीनी सकाळपासून वेगवेगळ्या वेळी प्रयाण केले.

जिल्हा प्रशासनाने G-20 बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचा पाहुणचार व आदरातिथ्य केले होते.  महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच निरोप देखील  देण्यात आला.  संगीतमय वातावरणात, लेझीमच्या तालात पुष्पहार, पैठणी, शेले देऊन केलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्या होत्या.

हॉटेल रामामध्ये महिलाविषयक परिषदा व चर्चासत्राबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, जोडीला चवदार पौष्टीक पदार्थाचा आस्वाद, याची अनुभूती देत प्रशासन तत्पर राहिले. प्रत्येक शासकीय विभागाने दिलेली जबाबदारी सांभाळत पाहुण्याची काळजी घेतली.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वात प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान यामध्ये राहिले. विमानतळावर आगमन आणि पाहुण्याचे निरोप सुरळीत व्हावे यासाठी विमानतळ प्रबंधक डी.जी.साळवे यांची टिम तसेच स्वागत समितीतील सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसिलदार ज्योती पवार, विक्रम राजपुत व महसुल प्रशासनाच्या टीमने परिषदेसाठी अलेल्या पाहुण्यांना आज निरोप दिला.

रामा हॉटेल, ताज विवांता हॉटेल यांच्यासह राज्य पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग यांच्या मार्फत G-20 परिषदेसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे स्वागत करण्यात आले.  शहर व शहरालगत असलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचे म्हणजेच वेरुळ लेणी, बिबी का मकबरा याठिकाणी पाहुण्यांनी पर्यटनाचा घेतला.

चैर्ली  मिलर, गॅल्याडीस नायर, शाझिया खान, तविशी सिंग, समंथा जान, लिंडा लॉरा शब्दानी, दीपा अहलुवालिया, फ्रॉन्सीस तोरनेअरी, ॲमू सॅन्याल, हॅरियाना हुताबरत, शमिका रावी, सोलडॅड हेरिरॉवो, गायत्री वासुदेवन, यांनी काल प्रयाण केले तर आज सुशेन जान फर्ग्युसन, कांता सिंग,  जयन मेहता, नीता इनामदार, स्वामीनाथन, वेरीना दि तिमारा, फराह अरब, इस्तानी सुरानो, ऍनी ॲन्जीलिया, क्रिस्तांन्ती, नरिनी बोल्हर, इशिता, कार्लो सोल्डाटीनी, स्टिफानो डी टरगीला, कॅर्थीना मिलर, इल्वीरा मारास्को,  शेविम किया, मधुसेन लक्ष्मी व्ही.टी, जानाभी फोकन, केलसे हॅरिस, सुहाभी, निधी गुप्ता, पूर्वी ठक्कर, ज्यलियन रोझीन, आयेशा अख्तर यांच्यासह इतर महिला प्रतिनिधीनी आज शहराचा निरोप घेतला.