अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

आ.सतीश चव्हाण यांची महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी

औरंगाबाद,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :- मागील आठ-दहा दिवसांपासून मराठवाड्यात जवळपास 250 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

Displaying photo 2.jpg

 राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (दि.10) आ.सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी तसेच यामुळे विविध ठिकाणी फुटलेले कोल्हापूरी बंधारे, खचलेले पूल, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आदी संदर्भात दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. आ.सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील सविस्तर निवेदन देखील अब्दुल सत्तार यांना दिले. मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍यांना कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी पिके पाण्याबरोबर वाहून गेली. नदी-नाल्यांच्या काठावरील जमिनी खरवडून निघाल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना सांगितले. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मूग, उडीद ही पिके ऐन काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने शेतातच मुगाला कोंब फुटत आहे. त्यात अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन, मोसंबीच्या शेतात पाणी साचले आहे. तर उस, मका, बाजरीची पिके आडवी झाली आहेत. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसर्‍या वर्षी देखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिले.   

      यावेळी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.आ.नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, किरण पाटील डोणगावकर, नंदकिशोर सहारे, धर्यशील तायडे आदींची उपस्थिती होती.