शेजारील राज्यातील निवडणुकांसाठी सुट्टी :राज्यात नवा पायंडा पाडणे चुकीचे-अजित पवार

मुंबई ,२३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विधान भवन, मुंबई येथे पत्रकार परिषद घेवून राज्यातील विविध मुद्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील विधीमंडळ हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात जाहीर झाले आहे. मात्र या अधिवेशनाला जास्त काळ मिळायला हवा, विविध विषयांवर रीतसर चर्चा करण्याची मागणी अजितदादांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहाता शेतकऱ्याला मिळणाऱ्या पीकविम्याची रक्कम अतिशय तूटपूंजी आहे. शेतकऱ्यांचा विमा राज्य सरकार उतरवत असेल तर शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळण्यासाठी कोर्टात जाण्याची वेळ सरकारने आणू नये. यात सरकारने पुढाकार घेऊन वेळ पडल्यास केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करून शेतकऱ्याला मदत करायला हवी, अशी स्पष्ट मागणी अजितदादांनी केली. तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनीधीत्व करणारे कोणीही नेते अथवा राजकीय संघटना राज्य सरकारकडे येतात तेव्हा अतिशय समंजस भूमिका सरकारने घेतली पाहीजे.

पुढे अजितदादा म्हणाले की, राज्यात रबी हंगाम सुरु झाला असून शेतीला पाण्याची गरज असताना वीजेचे कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ऊर्जा खात्याने जरी कनेक्शन तोडू नये असे सांगितले असले तरी ग्रामीण भागात कुठेही याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याऐवजी आदेश काढले तर ज्या लोकांना अशा अडचणीला सामोरे जावे लागते ते सरकारी आदेश दाखवू शकतील. तसेच राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेतून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने शेतकरी वर्गाला कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे शेजारील राज्यातील निवडणुकांसाठी महाराष्ट्रात काही ठराविक जिल्ह्यात सुट्टी देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. या आदेशातून राज्यात नवा पायंडा पाडणे चुकीचे आहे, याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवी, असे स्पष्ट मत अजितदादांनी मांडले.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी पक्षातील लोकांकडून जी वक्तव्य करण्याची गरज नाही अशी वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. या वाचाळवीरांना आवर घालण्याचे काम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज व्यक्त केली तसेच सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील सदस्यांनी बोलताना सर्व गोष्टींचे भान ठेवून बोलण्याची गरज आहे असे ते म्हणाले. दरम्यान अजितदादांनी राज्याचे महामहिम राज्यपालांच्या विचारातील अंधार दूर होऊदे, त्यांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थनादेखील केली. राज्यपाल महाराष्ट्राला अशोभनीय वक्तव्य का करतात हे राज्याला पडलेलं कोडं आहे. मात्र राज्यपालांनी खासगीत केलेल्या संभाषणात लक्षात आले की त्यांना इथून जाण्यासाठी वरिष्ठ परवानगी देत नाहीत म्हणून ते अशी वक्तव्य करत असावे अशी शंका घेण्याची जागा निर्माण होते, असे अजितदादा म्हणाले. तसेच महाराष्ट्रद्रोही मानसिकतेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

राज्यात समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासंदर्भात अजितदादा म्हणाले की, हे उद्घाटन १५ ऑगस्टला करण्यात येणार होते मात्र अजूनही या महामार्गाचे उद्धाटन झालेले नाही. हे उद्घाटन करण्याची त्या भागातील लोकांची मागणी आहे. करोडो रुपये खर्च करून केलेल्या कामाचे उद्घाटन झाले तर निश्चितपणे त्याचा परिणाम मराठवाडा-विदर्भातील विकासावर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

त्यानंतर पुणे येथील नवले पुलाजवळ झालेल्या अपघातावर अजितदादांनी सरकारला धारेवर धरले. सरकारला लोकांचा जीव महत्वाचा आहे की नाही. अशा दूर्घटना पुन्हा होणार नाही यासाठी यंत्रणा काय काम करते याची काळजी संपूर्ण राज्यभरात घेण्याची गरज आहे. राज्यात सप्टेंबर अखेरीपर्यंत अपघातांची २४,३६० इतकी नोंद झाली असून यापैकी ११,१४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरमहिन्याला सरासरी १,२३८ जणांचा बळी जात असेल तर ही शोभा देणारी बाब नाही, अशा शब्दात अजितदादांनी सरकारवर ताषेरे ओढले. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून योग्य उपाय काढत अपघात कसे घटतील याची खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.

दिवाळीतील आनंदाचा शिधा अजूनही राज्यातील अनेक ग्रामीण भागात लोकांना न मिळाल्यामुळे लोकांवर दुखी व्हायची वेळ आली आहे, अशा शब्दात अजितदादांनी सरकारला टोला लगावला. एका अभ्यासू मंत्र्याने केलेल्या वक्तव्यानुसार तळशी विवाहापर्यंत दिवाळी असते त्यानुसार आतापर्यंत लोकांना शिधा मिळणे स्वाभाविक होते मात्र हा शिधा अजूनही ग्रामीण भागात न मिळाल्याने सर्व सावळागोंधळ झाला आहे. फोटो आणि स्टीकरकरीता सामान्यांना मदत करणाऱ्या गोष्टी थांबत असतील तर हे महाराष्ट्राचे दूर्दैव आहे, असे ते म्हणाले. पुढे अजितदादांनी माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.