महाराष्ट्राचे राजकारण तापवणाऱ्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयचा खुलासा:दारूच्या नशेत तोल गेला

मुंबई ,२३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मालाड येथे मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र काही राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) तपासानंतर दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेला आणि १४व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली त्याच्या ५ दिवस अगोदर ही घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला होता. दिशा सालियानवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिचा खून झाला. हे सगळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. या गुन्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंचाही समावेश असल्याचा दावा राणेंनी केला होता. परंतु, आता सीबीआयच्या या अहवालामुळे दिशाची आत्महत्या झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.