शेतकऱ्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 15 प्रकरणे पात्र, 02 अपात्र

औरंगाबाद, दि.23 : शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. समाजात जागृती निर्माण करावी, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच बैठकीतील दाखल झालेल्या एकूण 17 प्रकरणांवर सविस्तर चर्चा केली. तसेच 15 प्रकरणांना पात्र ठरवून त्यांना तत्काळ मदत पोहोचविण्याचे निर्देशही श्री. चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.प्रारंभी श्री. जाधवर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीत दाखल प्रकारणांची माहिती सादर केली.