तत्कालिन महसुल राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडील अर्जांच्या चौकशी करण्याचे आदेश महसूल सचिवांना-औरंगाबाद  खंडपीठ

औरंगाबाद,​९​ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- डॉ. दिलावर मिर्जा बेग यांनी गेल्या तीन वर्षात जमीनीच्या व्यवहारांबाबत विद्यमान कृषी व महसुल राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडे किती अर्ज केले, यासंबंधी विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.याचिका ९ नोव्‍हेंबर रोजी सुनावणीस निघाली असता, आयुक्तांनी संबंधित विषय आपल्या कार्यकक्षेबाहेरील असल्याचे बुधवारी दि.९ नोव्हेंबर स्पष्ट केल्यानंतर औरंगाबाद  खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी महसूल विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले. सिलबंद लिफाफ्यात सचिवांनी २४ नोव्हेंबर रोजी अहवाल सादर करावा असे आदेशित केले आहे.

शहरातील जिन्सी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मालकीच्या सर्वे नं. ९२३३ येथील जागेच्या व्यवहारा संदर्भात डॉ. दिलावर मिर्जा बेग यांनी तत्कालिन महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे एक तक्रार अर्ज केला होता. त्यावर मंत्रालयातील संबंधित कक्ष अधिकार्याने चौकशीचे आणि प्रशासक मंडळ व संबंधीत अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चौकशीसाठी एक समितीदेखील गठीत करण्यात आली होती.
या आदेशाविरूध्द तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे व इतरांनी अ‍ॅड. प्रसाद जरारे यांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबंधीत तक्रारदार डॉ. दिलावर मिर्जा बेग हे जाणीवपूर्वक मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबत मंत्री अब्दुल सत्त्तार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात व कोणतेही अधिकार नसताना मंत्री अशा अर्जांवर आदेश पारीत करतात. अशाच प्रकारे जिन्सी येथील जमीनीबाबत देखील चुकीचे आदेश पारीत करण्यात आले असल्याचे अॅड. जरारे यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले होते.