दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्‍या वेदांतनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्‍या

औरंगाबाद,१४ जून /प्रतिनिधी:-  शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या  दोघांच्‍या वेदांतनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्‍या. विशेष म्हणजे पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून चोरी केलेल्या चार दुचाकी देखील जप्त केल्या आहेत. शेख रिझवान शेख करीम (२१) आणि ऋषिकेश बिसन जाधव (२३, दोघे रा. पुंडलीकनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्‍यांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सोमवारी  दि.१४ दिले.

वेदांतनगर पोलीस ठाण्‍याचे सहायक निरीक्षक अनिल कंकाळ हे पथकासह १३ जून रोजी हद्दीत घालत होते. त्‍यावेळी पथकातील अंमलदार अमोल अंभोरे (३२) आणि कांबळे असे हे दोघे कोकणवाडी भागात गेले असता गोपाल टी कडून एका दुचाकीवर (क्रं. एमएच-१५-क्‍यूजे-३९५९) दोनजण येत होते, मात्र दुचाकीवरील पुढील नंबर प्‍लेट दिसत नसल्यांनी त्‍यांनी दुचाकी थांबवण्‍यास सांगितले. पोलिसांना पाहताच  आरोपीने दुचाकीवर पळ काढण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र पोलिासंनी त्‍यांचा पिछापुरवत त्‍यांना पकडले. पोलिसांनी त्‍यांच्‍याकडे दुचाकीच्‍या कागदपत्रांची विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्‍तरे देऊ लागले. संशय आल्याने अंभोरे आणि कांबळे यांनी दुचाकीचा क्रमांक व चेसीस क्रमांक तपासला ते जुळले नाही. त्‍यामुळे दुचाकीस्‍वार दोघांना त्‍यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्‍यात आणले. 

पोलिसांनी ऋषिकेशची चौकशी केली असता त्‍याने सदरील दुचाकी ही निराला बाजार येथुन चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तपास केला असता सदरील दुचाकी (क्रं. एमएच-२०-ईसी-००७९) प्रेमचंद कासलीवाल यांची असून ४ जून रोजी ती चोरीला गेल्याचे स्‍पष्‍ट झाले. पोलिसांनी त्‍यांची कसून चौकशी केली असता सेव्‍हनहिल, सिल्लेखाना चौक आणि वाळूज येथून चार दुचाकी चोरल्याची कबुली त्‍यांनी दिली. त्‍यानूसार पोलिसांनी चोरट्यांकडून चार दुचाकी जप्‍त केल्या.

दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एल.डी. पागोरे यांनी दोघा आरोपींनी पुणे व औरंगाबाद येथील विविध भागातून दुचाकी चोरी करुन त्‍या विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली आल्‍याने त्‍या अनुषंगाने तपास करणे आहे. आरोपींनी पुणे येथुन चोरलेली दुचाकी सिल्‍लोड येथे विक्री केली आहे, ती जप्‍त करणे आहे. गुन्‍ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.