काँग्रेसचे २२ आमदार फुटणार – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद,५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेले आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे हे सरकार वाचवण्यासाठी भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलताना खैरे म्हणाले की, निवडणुकीत मुस्लिम समाजाची बोनस मते शिवसेनेला मिळतात. मुस्लिमांची २० टक्के मते शिवसेनेला मिळणार असून, ती आपली बोनस मते आहेत. तर लवकरच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होतील आणि हे सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले आहे. त्यामुळे यापूर्वी शिवसेनेत झालेली बंडखोरी आता काँग्रेसमध्ये पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.