चंद्रकांत खैरेंना नाना पटोलेंनी खडसावले:स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही त्यांना इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही

मुंबई : ज्यांना आपला स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही त्यांना इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत खैरे यांना खडसावले आहे.

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरल्यास काँग्रेसचे २२ आमदार फडणवीस यांच्यासोबत जातील, असे विधान चंद्रकांत खैरे यांनी केले होते. त्यावर नाना पटोले यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचे काही कारण नाही, असे नाना पटोले म्हणाले.

खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना असा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील काँग्रेस आमदार फुटणार असल्याची अनेकदा चर्चा झाली. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर अशोक चव्हाण, असलम शेख यांच्यासह अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा झाली. त्यात आता खैरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आमदार फडणवीसांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.