वर्धापन दिनाअगोदर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के;मनिषा कायंदेंसह आणखी तीन जणांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन उद्यावर येऊन ठेपला असतानाही ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. ठाकरे गटातील अनेक नेते पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदेंनी आधीच्या शिवसेनेत बंड करुन वेगळा गट स्थापन केल्यापासून हे पर्व सुरुच आहे. मात्र शिवसेनेतून कोणीही ठाकरे गटात परतलेले नाही.

मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.

ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. मूळच्या शिक्षिका असणार्‍या मनिषा कायदेंनी २०१२ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला व एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडली. ठाकरे गटाच्या महिला नेत्यांमध्ये नाराजी असतानादेखील त्यांना उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्याच पक्ष सोडून जात असल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी अखेर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आज शिबिरात असलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी म्हटले की, माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे यांच्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल का झाला आत्ताच का झाला? हा सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामातून त्यांना उत्तर दिलं असल्याची कायंदे यांनी म्हटले. बाळासाहेबांचे शिवसेना इथे आहे म्हणून मी इथे आहे. कोणी तरी सांगितलं कचरा निघून जात आहे.  कचरातून ऊर्जा निर्मिती होते  असं म्हणत कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मै भी कुछ नही करूंगा ,,,किसी को कुछ नहीं करने दूंगा असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोविड काळामध्ये जनतेला कोण भेटत होतं, हे जनतेला माहीत आहे. नुसतं फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाइनच्या माध्यमातून माणसं वाचत नसतात. अडीच वर्षे मध्ये त्या सरकारने काय काम केलं आणि अकरा महिन्याचे सरकार काय काम केलं हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सर्व काम अडीच वर्षामध्ये बंद केले अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यांच्याकडे एकच कॅसेट वाजत असते. आता त्यांना स्क्रिप रायटर बदलला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला. नवीन विचार आमच्याकडे आहे. ते आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊन अकरा महिना मध्ये काम करून दाखवलं आहे. उद्या वर्धापन दिनाच्या दिवशी अधिक बोलणार असल्याचे सूचक वक्तव्यही मुख्यमंत्री शिेदे यांनी केले.

शिशिर शिंदे व तांडेल पती पत्नीचाही राजीनामा

ठाकरे गटाचं उपनेतेपद सांभाळणा-या शिशिर शिंदेंनी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे काल आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच चुनाभट्टी येथील नगरसेवक असणार्‍या स्वाती तांडेल व विजय तांडेल या जोडप्याने देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे व ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.