आशिष देशमुख यांची पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी

नागपूर , १८ जून   / प्रतिनिधी :-काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेस जीर्ण आणि म्हातारी झाली असल्याचं म्हणत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसंच देशमुख यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचा परफॉर्मन्स राहीलेला नाही, त्यांनी मला पक्षातून काढल हे चांगलं झालं. त्यामुळे मी भाजपात येऊ शकलो. आता मी 2024 ची विधानसभा लढवणार नाही. भाजपच्या हितासाठी काम करेल, अशी घोषणा देशमुख यांनी केली आहे. त्यांनी ही घोषणा केल्यावर सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

यावेळी देशमुख यांनी भाजपमध्ये आल्यानंतर सावनेरमधील दादागिरी, काटोलमधील काकागिरी आणि विदर्भातील नानागिरी संपवणार असून काटोलमधून भाजपचा उमेदवार निवडून आणणार आहे, अशी घोषणा केली. नाना पटोले आणि नितीन राऊत यांना आम्ही आमदार केलं. आमदारकी मोठी गोष्ट नसून विदर्भाच्या हितासाठी भाजपमध्ये आलो असून आता तह्ह्यात भाजपातंच राहायचं वचन तु्म्हाला देतो. तसंच 20-25 आमदार वाढण्यासाठी मी मदत करणार आहे. मला पक्षात थोडी व्यापक भूमिका द्या, असही ते यावेळी म्हणाले.

तसंच त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘सुबह का भूला शाम को घर आये तो उसे भूला नही कहते’, असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली. पक्षात प्रवेश दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कौतूक देखील केलं. राज्यात फडणवीस यांचं नेतृत्व सक्षम असून सर्व विरोधी नेते त्यांच्या सोबत आहे. मी गेली विधानसभा त्यांच्या विरोधात लढलो तरी आज त्यांच्या सोबत आहे, असं देखील आशिष देशमुख म्हणाले आहेत.