‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन

औरंगाबाद, दि.6  :-माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेंतर्गत आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातील प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले.

यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, महादेव किरवले, संगिता सानप तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ घेतली की करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वत: माझ्या कुटुंबात, परिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात  2 मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. करोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने  व सद्भावाने वागेन. करोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले- डॉक्टर, नर्स रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करेन या प्रतिज्ञेचे वाचन केले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी आपण सर्व समूह भावनेतून काम करत आहोत. त्यामुळे कोरोनाचा चढता आलेख खाली आणण्यात आपल्याला यश मिळत आहे. याच एकत्रित प्रयत्नांतून जिल्हा कोरोनामुक्त करु, असे आवाहन केले.