देशभरात थंडीचा कडाका; दिल्लीमध्ये थंडीसोबत प्रदुषणात वाढ

नवी दिल्ली,२​९​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-गेल्या आठवड्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता थंडीची चाहुल लागली आहे. यंदा पावसाळा बराच काळ लांबल्याने थंडीही उशिरा सुरू होण्याचे संकेत मिळत होते, मात्र ऑक्टोबरच्या पंधरवड्यानंतरच दिवाळीदरम्यान लागलेली थंडीची चाहुल पाहता देशभरात आता थंडीचा कडाका वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये थंडीसोबत प्रदुषणात वाढ झाल्याने दिल्लीकरांचा श्वास कोंडला जात आहे. खराब हवामानाचा फटका आता मुंबईसह दिल्लीकरांनाही बसू लागल्याने श्वसनाच्या त्रासात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर थंडी वाढल्याने दिल्लीसह अन्य राज्यातही थंडी सोबत प्रदुषणात वाढ झाली आहे. यूपी-बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आता थंडीने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, थंडी वाढल्याने उत्तर भारतात पाऊस थांबला आहे. काही प्रमाणात दक्षिण भारतातील राज्यांनाच ढगांचा धोका असल्याचे दिसून येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून दिल्लीसह मुंबईतही हवामान खराब झाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये उत्तर प्रदेश-बिहारसह पावसाचा कोणताही अंदाज नाही. मात्र, या भागातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. मात्र पुढील चार दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर ते हिमाचल या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानात घट दिसून येत आहे. याचबरोबर महाराष्ट्रातही पुढचे १० दिवस हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दिल्लीत थंडीसोबतच प्रदूषणाचा प्रभावही वाढू लागला आहे. दिल्लीत मागच्या काही दिवसांच्या तुलनेत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे प्रदुषणाचे कण जैसे थे राहिल्याने धुक्याचे सावट आले होते.