पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

नवी दिल्ली ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि  युक्रेन संदर्भातील ताज्या घडामोडींविषयी माहिती केली. रशिया आणि नाटो समूहादरम्यानचे मतभेद प्रामाणिक आणि गांभीर्याने केलेल्या वाटाघाटींच्या माध्यमातूनच दूर करता येतील याबाबतचा आपल्या प्रदीर्घ काळापासून असलेल्या दृढविश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. हिंसाचार तातडीने थांबवण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले आणि राजनैतिक वाटाघाटी आणि  विचारविनिमय या मार्गाचा अवलंब सर्व बाजूंनी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह धरला. 

युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात विशेषतः तेथील विद्यार्थ्यांच्या वाटत असलेली चिंता पंतप्रधानांनी रशियाच्या अध्यक्षांकडे बोलून दाखवली. त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढणे आणि भारतात परत आणणे याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची माहिती त्यांनी पुतिन यांना दिली. 

यावेळी दोन्ही नेत्यांनी आपले अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांची पथके परस्पर हितांच्या मुद्यांसंदर्भात एकमेकांच्या सातत्याने संपर्कात राहतील, याबाबत सहमती व्यक्त केली.