केंद्र सरकार 10 लाख नोकऱ्या देणार -पंतप्रधान मोदी 

पंतप्रधानांनी गुजरात रोजगार मेळ्याला केले संबोधित

नवी दिल्ली,२​९​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे गुजरात रोजगार मेळ्याला  संबोधित केले.पंतप्रधानांनी विविध श्रेणींमध्ये विविध पदांसाठी नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या हजारो तरुण उमेदवारांचे अभिनंदन केले . धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी राष्ट्रीय स्तरावर रोजगार मेळा सुरू केल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली, ज्यात  त्यांनी 75,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित केली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी पंतप्रधांनानी सांगितले होते  की, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित केले जातील. गुजरातने वेगाने पुढे जात  आज 5000 उमेदवारांना गुजरात पंचायत सेवा मंडळाकडून नियुक्तीपत्रे मिळत आहेत, 8000 उमेदवारांना गुजरात उपनिरीक्षक भर्ती मंडळ आणि लोकरक्षक भर्ती मंडळाकडून नियुक्ती पत्रे मिळत आहेत असे ते म्हणाले. या जलद प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूचे  अभिनंदन केले. गुजरातमध्ये अलिकडच्या काळात 10 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून पुढील एका वर्षात 35 हजार पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्याचे श्रेय  राज्याच्या नव्या  औद्योगिक धोरणाला दिले. त्यांनी ओजस सारख्या डिजिटल मंचाची  तसेच  वर्ग 3 आणि 4 पदांसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द झाल्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘अनुबंधम ’ मोबाईल अॅप आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातले  नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांना परस्परांशी जोडून रोजगार प्रक्रिया सुरळीत केली जात आहे. त्याचप्रमाणे गुजरात लोकसेवा आयोगाच्या जलद भर्ती मॉडेलचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे.

पुढील  काही महिन्यांत अशा प्रकारचे रोजगार मेळावे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आयोजित केले जातील असे पंतप्रधान म्हणाले.  त्याचबरोबर केंद्र सरकार 10 लाख नोकऱ्या देण्यावर काम करत आहे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही या मोहिमेत सहभागी होत आहेत, ही संख्या लक्षणीयरित्या  वाढेल. “यामुळे  शेवटच्या गावातील व्यक्तीपर्यंत सेवा आणि सरकारी योजना पोहचवण्याच्या मोहिमांना अधिक बळ मिळेल ” असे  ते म्हणाले.

2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठीच्या  भारताच्या वाटचालीत या तरुणांची असलेली  महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत पंतप्रधानांनी त्यांना समाज आणि देशाप्रति असलेले कर्तव्य पार पाडायला  सांगितले. तसेच त्यांना नवीन शिकत राहण्याचा , कौशल्य प्राप्त करण्याचा सल्ला दिला  आणि नोकरी शोधणे म्हणजे वृद्धीचा शेवट आहे असे समजू नका असे सांगितले. “यातून तुमच्यासाठी अनेक संधी खुल्या झाल्या आहेत.  समर्पित भावनेने  तुमचे काम केल्यास तुम्हाला अपार समाधान लाभेल आणि वृद्धीची तसेच प्रगतीची दारे उघडतील” असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.