विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या वीज कामगारांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत

आ.बोरणारे यांच्या हस्ते धनादेश प्रदान

वैजापूर,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कन्नड तालुक्यातील नावडी गावात तीन महिन्यापुर्वी महावितरणची विद्युत लाईन ओढताना विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झालेल्या चार वीज कामगारांच्या  कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते शनिवारी मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

तीन महिन्यांपूर्वी कन्नड तालुक्यातील नावडी गावात ही घटना घडली त्यावेळी वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी नावडी येथे जाऊन अपघाती मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन वैयक्तिकरित्या प्रत्येक कुटुंबास 50 हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत दिली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून घटनेची माहिती दिली असता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबास 5 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते.त्यानुसार आज मृत कामगारांच्या कूटुंबास प्रत्येकी 5 लाख रुपयांचा धनादेश आमदार बोरणारे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. मृत पावलेल्या कामगारांच्या पत्नी श्रीमती शोभाबाई बाळकृष्ण मगर, श्रीमती सविता गणेश थेटे, श्रीमती सविता भरत वरकड, श्रीमती रंजना जगदीश मुरकूडे यांनी मदतीचे धनादेश स्वीकारले व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व आ.बोरणारे यांचे आभार मानले.

याप्रसंगी जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, बाजार समितीचे माजी उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघ, गोकुळ पाटील आहेर, गोरख पाटील आहेर, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील कदम, विभागप्रमुख नंदूभाऊ जाधव, सुनिल सोनवणे, आबासाहेब पवार, सरपंच विलास जाधव, उपसरपंच निवृत्तीनाथ मुरकुंडे, सुरेश मगर आदी उपस्थित होते.