‘तर पंतप्रधान मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत…’ पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

अंबाजोगाई ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाबाबत मोठं विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण वंशवादाचं प्रतिक आहोत. मात्र जनतेच्या मनात असेन तोपर्यंत पंतप्रधान मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत असं मोठं विधान पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमातल्या भाषणादरम्यान केलं आहे. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं ‘समाजातील बुद्धिजिवी लोकांच्यासोबत संवाद’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेस पक्ष वंशवादाचं राजकारण सुरु असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

May be an image of 6 people, people standing and temple

आपल्याला जात, पात, पैसा, प्रभाव यांच्या पलीकडे जाऊ विचार करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. कुठे नवरात्री करा, कुटे तमाशा बोलवा, हे काय चाललं आहे, पंतप्रधान मोदींना हे राजकारण अभिप्रेत नाही. असं बोलत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे अप्रत्यक्ष टोला लगावला.