आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने विलंबाबाबत कानउघाडणी केल्यानंतर आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज, सोमवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सुनावणीचे प्रारूप किंवा रूपरेषा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून सर्वोच्च न्यायालयास त्याबाबतचे वेळापत्रक सादर केले जाणार आहे.

आमदार अपात्रतेच्या याचिकांवर नार्वेकर यांनी नोटिसा बजावण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यांनी तातडीने निर्णय द्यावा, अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील एका प्रकरणात तीन महिन्यांचा कालावधी विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याचा दाखला ठाकरे गटाकडून दिला जात आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या ५४ आमदारांविरोधात दोन्ही गटांकडून याचिका सादर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक याचिकेवर दोन्ही बाजूंना युक्तिवादासाठी एक-दोन दिवस आणि त्यानंतर अंतिम युक्तिवादासाठी काही दिवसांचा कालावधी गृहीत धरल्यास निर्णयासाठी तीन ते चार महिने लागतील. शिंदे-ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनाही बाजू मांडण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार असून त्यांच्या युक्तिवादासही काही कालावधी लागणार आहे.

प्रकरण काय?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने तात्काळ शिंदेंसह त्यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी उपाध्यक्षांकडे (तेव्हा अध्यक्षपद रिक्त होते) अर्ज केला होता. त्यानंतर शिंदे यांना साथ देणाऱ्या सर्व ४० आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला. शिंदे गटाने आदित्य ठाकरे वगळता ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. अशा रीतीने ५४ आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे.