पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कबुलीने खळबळ

अंबाजोगाई,२१ जानेवारी / प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकजा यांना डावलले जात असल्याची चर्चाही अनेकदा झाली होती. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र भाजप नेत्यांकडून रचले जात असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान, त्यांनी जालना येथे प्रचार सभाही घेतली. तेव्हा आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, भाजपमधील एक गट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहे. कोणीतरी हे जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न करत आहे. बीडमधील मंचावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “पंकजाताईंचा सन्मान करण्यासाठी माझ्यानंतर बोलण्याचा आग्रह मीच केला होता. पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि त्यांचा अपमान करणे हास्यास्पद आहे.” पक्षातील काही लोक पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. 

पंकजा मुंडे कुणाला म्हणाल्या करण-अर्जुन?

पंकजांनी उघडपणे आजवर नाराजी कधीच बोलून दाखवलेली नाही मात्र त्यांच्या विधानांमधून किंवा कृतीतून त्यांची खदखद व्यक्त होते. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच पंकजा मुंडे यांनी आपली घुसमट बोलून दाखवलीय. करण-अर्जुन युद्धाचा दाखला देत यापुढे बाहेरच्यांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करु नये असा इशाराच दिला. विशेष म्हणजे पंधरा दिवसात दोन वेळा देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर होते, त्यानंतर पंकजांचं हे विधान आल्यानं चर्चांना उधाण आलंय.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार  स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुनर्वसन होईल अशी चर्चा होती. पण पंकजांना कुठेच स्थान मिळालं नाही, त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा नाराज असल्याचं बोललं जातंय. 15 दिवसात देवेंद्र फडणवीसांनी दोन वेळा बीडचा दौरा केला. मात्र पंकजा मुंडे दोन्ही कार्यक्रमात दिसल्या नाहीत. 

फडणवीस जिथे असतात तिथे तुम्ही जाणं टाळता का असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले होते, त्या कार्यक्रमाला मी अपेक्षित नव्हते, म्हणून मी तिथे आले नाही, मी भाजपाच्या संस्कारात वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाचा आणि संघटनेचा प्रोटोकॉल मी पाळते, पण पक्षाबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला बंधनकारक नाही, असं त्या म्हणाल्या.