वैजापूर येथे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवक- युवतींना मोफत प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

वैजापूर,१३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- ज्या देशाचे युवक-युवती कौशल्यपूर्ण उद्यमशील व कर्तृत्व संपन्न असतात त्या देशाची सर्वच क्षेत्रात उत्तमोत्तम प्रगती व उन्नती होते व तो देश विकासाच्या उंच शिखरावर  पोहचतो असे प्रतिपादन स्वच्छतादूत व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी  नगर परिषद संचालनालय, महाराष्ट्र शासन, नगर परिषद वैजापूर व व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर यांच्या मार्फत आयोजित तीस दिवशीय कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक राजेश गायकवाड होते. पालिकेचे प्रकल्प अधिकारी दिवाकर त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती.  पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत मिळणारे हे तीस दिवशीय मोफत प्रशिक्षण प्रत्येक युवक -युवतीनी घ्यावे व स्वयंरोजगारसाठी समर्थ होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. असे श्री.राजपूत पुढे बोलतांना म्हणाले.

तेलघाणी व्यापारी संकुलात सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गात दहावी व बारावी उत्तीर्ण 90 युवक-युवतींनी प्रशिक्षणासाठी नोंद केली असून त्यांना तज्ञ मार्गदर्शक ज्योती राऊत, कोमल राऊत व जयश्री बोरसे या संगणकाद्वारे हे प्रशिक्षण देत आहेत. सध्या संगणकीय प्रणाली द्वारे सर्व व्यवहार होतात त्याचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण या केंद्रात दिल्यावर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल व उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्वयंरोजगारसाठी नगरपालिका सहकार्य करील असे नगर परिषदेचे या वर्गाचे प्रमुख सुनील भाग्यवंत यांनी प्रास्ताविकात विशद केले.