मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करून त्यांच्यावर कारवाईची पालखेडचे सरपंच अनिल वाणी यांची मागणी

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पालखेड ता.वैजापूर येथील श्री.पारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्यध्यापकासह अकरा सहशिक्षक मुख्यालयी वास्तव्य करत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शिक्षकांना त्याच्या मासिक वेतनात मिळणारा आर्थिक निवास भत्ता लाभ बंद करुन त्यांच्या विरोधात फसवणूक केल्याची कडक कारवाई करण्याची मागणी पालखेड ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल वाणी यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी याच्याकडे केली आहे.

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद अतर्गत गाव पातळीवर कार्यरत कर्मचा-याविरोधात मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा तीव्र केला आहे. याच विषयावर पालखेड ग्रामपंचायतीचे सरपंच वाणी यांनी अनुदान तत्वावरील खाजगी संस्थेतील शिक्षक आणि कर्मचा-याचा अपडाऊन करण्याचे कृतीला लगाम घालण्यासाठी त्यांनी शिक्षक व शिक्षिकांविरोधात रणशिंग फुंकले आहे. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेळके यांनी शाळेतील शिक्षक नियमानुसार कर्तव्याच्या ठिकाणी राहत नसल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून येत्या काळात तालुकाभरात खाजगी शिक्षक मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावपातळीवर कार्यरत शिक्षकवृंद मुख्यालयी राहत नाहीत.  त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाचा स्तर ढासळला असल्याचे विषयावर आमदार प्रशांत बंब यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालखेड ग्रामपंचायतीने गावातील श्री.पारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांना  गावातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी अनुदान तत्वावरील शाळेत कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी  गावात राहतात की अप डाऊन करतात असे लेखी पत्र देऊन पडताळणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर गावातील श्री.पारेश्वर शिक्षण संस्थेत कार्यरत एकूण पंधरा शिक्षक आणि कर्मचारी पैकी तब्बल अकरा शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे मुख्यध्यापक एन.आर.बागुल यांनी  उलट टपाली कळवल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चार शिक्षक वगळता मुख्याध्यापकासह अकरा शिक्षक औरंगाबाद येथून अपडाऊन करत असल्याची बाब उघडकीस आली.या संदर्भात सरपंच अनिल वाणी यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पालखेड येथून अपडाऊन करणा-या शिक्षकाचे वेतनातून निवास भत्ता बंद करुन त्यांच्या विरोधात फसवणूक केल्याची कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
ग्रामपंचायतीने एकाच शाळेची माहिती घेतली -मुख्याध्यापक एन आर बागुल 

ग्रामपंचायतीने पालखेड गावातील एकाच शाळेला टार्गेट केल्याचा आरोप मुख्याध्यापक बागुल यांनी केला आहे. शाळेतील 450 विद्यार्थ्याची गुणवत्ता दर्जेदार आहे याची पडताळणी करावी असे त्यांनी स्पष्ट करुन मुख्यालयी राहत नसल्याच्या प्रकारावर कोणतीही लपवाछपवी न करता आहे आहे ती सत्यस्थिती जाहीर केली…मुख्यालयी वास्तव्यास नसलेले शाळेतील शिक्षक पुढील प्रमाणे – मुख्याध्यापक एन. आर. बागुल, सहशिक्षक व्ही.आर.बागाईतदार, एस.ओ. गुंजाळ, ए. जी  राउत, एस. एस. पवार, के. एस. जगदाळे, एस. पी. कोहुळे, एन. आर. शिंदे, श्रीमती जे. ए. भालेराव, व्ही. आर. अंभोरे.
वैजापूर तालुक्यातील शाळाची माहिती

जिल्हा परिषद: 320  प्राथमिक शाळा, माध्यमिक प्रशाला एकूण 10,

शिक्षक संख्या -प्राथमिक विभाग 856, मुख्याध्यापक – 98

खाजगी अनुदान तत्वावरील शाळा: एकूण 41, कार्यरत शिक्षक संख्या- 275