टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

पालघर : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला आहे. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचे समजत आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

cyrus

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री हे २०१६ साली टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सन  २०१२ मध्ये रतन टाटा यांनी पायउतार झाल्यानंतर ‘टाटा सन्स’ या व्यावसायिक समूहाच्या नेतृत्वासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. परंतु, २४ ऑक्टोबर २०१६ रोजी, टाटा सन्सच्या बोर्डाने मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी मतदान केले. नटराजन चंद्रशेखरन यांची लवकरच नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. गैरव्यवस्थापन आणि अल्पसंख्याक भागधारकांच्या हक्कांचे दडपशाहीच्या आरोपांनी हा वाद चिघळला. २०२१मध्ये न्यायालयाने टाटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे शापूरजी पालोनजी समूह आणि टाटा सन्स यांच्यातील संबंध आणखीन बिघडले. सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी जून २०२२ मध्ये निधन झाले होते.

आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली

‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते  केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.