केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन; बाप्पाच्या दर्शनानंतर महत्त्वाच्या बैठका

मुंबई ,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत अतिरिक्त पोलिस दल तैनात केला असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.गणपती दर्शनाच्या निमित्ताने ठेवलेला केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच वेगवेगळ्या चौक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस दलाची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असून, गणेश उत्सव झाल्या आठवड्याच्या शेवटी व्यवस्थापित केली जाईल. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही बंदोबस्ताचा भाग होण्यास सांगितले आहे. शाह यांचे शहरात आगमन होण्यापूर्वी सायंकाळी ४ वाजल्यापासून मुंबईभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येणार असले तरी, या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. त्यामुळे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमित शहा यांचा या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली जाणार आहे. यासाठी उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे.