ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित

ऑगस्ट महिन्यातील जीएसटी महसूल संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 28% अधिक

नवी दिल्ली,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित झाला असून त्यात केंद्रीय वस्तु आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटीचा हिस्सा 24,710 कोटी रुपये आहे, राज्यांचा वस्तू आणि सेवा कर एसजीएसटीचा हिस्सा 30,951 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा 77,782 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 42,067 कोटीं रुपयांसह) आहे आणि उपकराच्या माध्यमातून 10,168 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 1,018 कोटी रुपयांसह) महसूल प्राप्त झाला आहे.

सरकारने ठरल्याप्रमाणे आयजीएसटीमधून सीजीएसटीला 29,524 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 25,119 कोटी रुपये चुकते केले आहेत. नियमित समझोत्यानंतर , ऑगस्ट 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 54,234 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 56,070 कोटी रुपये इतका आहे.

ऑगस्ट 2022 मधील जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील 1,12,020 कोटी रुपये जीएसटी महसुलाच्या तुलनेत 28% इतका अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 57% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 19% जास्त आहे.

गेले सलग सहा महिने, मासिक जीएसटी महसूल संकलन 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ऑगस्ट 2022 पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 33% इतकी वाढ झाली असून ही वाढ मोठ्या प्रमाणात उत्साहवर्धक आहे. अधिक चांगल्या प्रकारे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी जीएसटी परिषदेने मागील काळात केलेल्या विविध उपाययोजनांचा हा स्पष्ट परिणाम आहे.जीएसएसटी संकलनाच्या उत्तम नोंदीसह अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा सकारात्मक परिणाम जीएसटी महसुलावर सातत्यपूर्ण आधारावर दिसून येत आहे. जुलै 2022 मध्ये 7.6 कोटी ई-वे देयकांची निर्मिती झाली, जी जुलै 2022 मधील 6.4 कोटी देयकांच्या तुलनेत 19 % अधिक आहे.

ऑगस्ट महिन्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रात 18,863 कोटी रुपये इतके झाले असून गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत त्यात 24% वाढ नोंदवण्यात आली.