सत्ता हे आमच्यासाठी सेवेचे माध्यम -पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाच्या संकटात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ऐतिहासिक सेवाकार्य ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

Image

मुंबई, ४ जुलै २०२०

कोरोनाच्या संकटात सर्वजण आपापला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांनी देशभरात व्यापक व दीर्घकाळ सेवाकार्य केले, ही इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर सेवाकार्य केले. त्यापैकी महाराष्ट्रासह सात राज्यांच्या कार्याचे सादरीकरण शनिवारी पंतप्रधानांसमोर व्हिडिओ बैठकीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपाच्या दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष व संरक्षणमंत्री राजनाथसिंह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईत भाजपाच्या कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि राज्यातील पक्षाच्या सेवाकार्याचे समन्वयक संजय उपाध्याय उपस्थित होते.

Displaying Bjp Press Photo -2.jpg

महाराष्ट्रातील सेवाकार्याचे सादरीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून बोलताना, ‘ज्यावेळी स्थलांतरित कामगारांना मदतीची सर्वाधिक गरज होती, त्यावेळी आपल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. खूप खूप अभिनंदन,’ अशा शब्दात प्रदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सात राज्यांचा सेवाकार्याचा वृत्तांत ऐकल्यानंतर जाणवले की, खूप व्यापकतेने, विविधतेने, प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात सेवाकार्य केले. ही ऐतिहासिक घटना आहे. भाजपाचे शेकडो खासदार, हजारो आमदार आणि लाखो कार्यकर्ते सेवा हीच प्राथमिकता मानून कार्यात गुंतले. मला अशा संघटनेचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.

ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटात सेवा करताना आपल्याला संसर्ग होण्याचा धोका असूनही कार्यकर्त्यांनी सेवा केली. अनेक कार्यकर्त्यांचे निधन झाले. त्यांना आपण विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

ते म्हणाले की, राजकीय भाष्यकार केवळ निवडणुकीच्या संदर्भात संघटनेकडे पाहतात. पण भाजपाची संघटना केवळ निवडणुका जिंकणारे यंत्र नाही तर भाजपासाठी संघटना म्हणजे सेवा करण्याचे तसेच राष्ट्राच्या आणि व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करण्याचे साधन आहे. सत्ता हे आमच्यासाठी सेवेचे माध्यम आहे.

Displaying Bjp Press Photo - 3.jpg

त्यांनी सांगितले की, हा सेवा यज्ञ असाच पुढे चालू ठेवावा आणि कोरोनाच्या साथीच्या विरोधातील लढाई थांबवू नये. आगामी काळ सणांचा असून या काळात स्वतःला सावध ठेवावे आणि इतरांनाही सावध करावे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सादरीकरणात राज्यात भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या व्यापक सेवाकार्याची माहिती दिली. राज्यात भाजपा कार्यकर्त्यांनी ४२ लाख परिवारांना रेशन किट वाटली, २ कोटी ८८ लाख फूड पॅकेट्स वाटली, ५६० कम्युनिटी किचन चालवली, ६८ लाख फेसकव्हर किंवा मास्क वाटले, ३६ हजार युनिट रक्त संकलन केले, डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना ७० हजार पीपीई किट दिले, २ लाख ६५ हजार लोकांचे स्क्रिनिंग केले तसेच १५ हजार ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना औषधे व जीवनावश्यक वस्तू पोहचविल्या. राज्यातून आपापल्या घरी जाणाऱ्या श्रमिकांना भाजपा कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यांना १६ लाख फूड पॅकेट्स दिली तसेच पायी जाणाऱ्यांना पादत्राणे, पाणी, आरोग्य तपासणी अशा सुविधा दिल्या. भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सफाईचे काम केले. सेवाकार्यात पक्षाने ३० कार्यकर्ते गमावले.

राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात ज्या प्रकारे देशाचे नेतृत्व केले त्यामुळे संपूर्ण जगाला दिशा मिळाली. त्यांनी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी घेतलेल्या निर्णयांची जागतिक पातळीवर प्रशंसा झाली. कोरोनाच्या संकटात समाजातील दुर्बल घटकांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी सूचना केल्यानंतर पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी हे काम केले. लॉकडाऊनमुळे डिजिटल माध्यमांचा वापर करून व्यापक संपर्क केला आणि बूथपातळीपर्यंत सेवाकार्य करून कोट्यवधी लोकांना मदतीचा हात दिला.

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी स्वागत केले. राष्ट्रीय सरचिटणीस भुपेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्राखेरीज राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या प्रदेश शाखांनी सेवाकार्याची माहिती दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *