शेती आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी प्रयत्नरत राहू – पद्मविभूषण खासदार शरद पवार

शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळण्यासाठी  नवीन प्रकल्प उभारणीबरोबरच इथेनॉल व सहवीज निर्मितीवर भर-पालकमंत्री राजेश टोपे

ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

जालना ,१६ एप्रिल  /प्रतिनिधी :-शेतकरी हाच देशाचा आर्थिक कणा आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या बियाण्याची लागवड करण्याबरोबरच  नगदी पिके घेण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचा विकास होण्याच्यादृष्टीने शेती आणि शेतकरी संपन्नतेसाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी केले. तर ऊस गाळपचा नवीन प्रकल्प उभारणी बरोबरच देशात मागणी असलेल्या सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्प उभारणीवर अधिक भर देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच  ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

May be an image of 7 people, people sitting and people standing

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथे 60 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज  झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते.

          कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे,आमदार रोहित पवार, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण,  माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, उत्तमराव पवार,शिवाजीराव देशमुख, मनोज मरकड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

May be an image of 1 person, standing and flower

          खासदार शरद पवार पुढे म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट ही एक अग्रगण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार बियाण्यांच्या निर्मितीबरोबरच शेतीला पूरक असणाऱ्या अनेक सुविधा राज्यभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. या संस्थेची एक शाखा जालन्यात जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संस्थेसाठी पाथरवाला येथे 105 एकर जागेची खरेदीही करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून तयार होणारे उत्तम बियाणे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल, असा विश्वासही खासदार श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.  साखर कारखान्यांना आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची सातत्याने कमतरता भासत असते. या कारखान्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी

या संस्थेच्या माध्यमातूनच जालना जिल्ह्यातील होतकरू तरुणांना आवश्यक असे तांत्रिक शिक्षण देण्यात येऊन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

May be an image of 6 people and people standing

संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होत असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप  करण्याचा प्रश्न भेडसावत आहे. राज्य शासनामार्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत या परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे शेवटच्या टिपराचे गाळप होण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने समर्थ सहकारी कारखाण्याचे तिसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. या युनिटच्या उभारणीसाठी सर्वांनी  त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     वाहनांसाठी आवश्यक असलेल्या इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉल हा पर्याय संपूर्ण देशाने मान्य केला असून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादनही करण्यात येत आहे. जालनासारख्या ठिकाणीही समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथेनॉल 2 लक्ष 10 हजार लिटर निर्मिती होत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब असून या इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना  निश्चित अधिकची रक्कम मिळणार असल्याचेही खासदार श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

 नवीन प्रकल्प उभारणीबरोबरच इथेनॉल व सहवीज निर्मितीवर भर–पालकमंत्री राजेश टोपे

May be an image of 1 person, standing and flower

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, गत तीन वर्षांत जिल्ह्यात पावसाचे चांगले प्रमाण असल्याने  शेतकऱ्यांकडून ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाचे शेवटच्या टिपराचे गाळप व्हावे, यादृष्टीने समर्थ सहकारी साखर कारखान्याने प्रयत्न केले. कारखान्यामार्फत प्रतिदिन 1 हजार 500 टन प्रतिदिन ऊस गाळपाची क्षमता वाढविण्यात आली आहे.

      येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकचा भाव मिळावा यासाठी केवळ गाळप करून चालणार नाही तर सहवीज व इथेनॉल प्रकल्प उभारण्याची गरज आहे. आज या ठिकाणी 60 हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मितीचा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला असून येत्या काळात सागर सहकारी कारखाना येथेही असाच प्रकल्प उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    समर्थ सहकारी साखर कारखान्याने दरवर्षी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे कारखान्याला आतापर्यंत विविध 30 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून येणाऱ्या काळातही  शेतकऱ्यांच्या हितासाठीच कारखान्यामार्फत काम करण्यात येणार असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील— सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

May be an image of 1 person, standing and flower

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, ज्या विभागात कारखान्याचे गाळप बंद झाले आहे, तेथील हार्वेस्टर ज्या भागात ऊस आहे,  तेथे आणण्यात येतील. तसेच नवीन साखर प्रकल्पाना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. ऊसापासून साखरेसोबतच इथेनॉल, वीजनिर्मितीवर अधिक भर दिला जावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. श्री. पाटील यांनी यावेळी कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

     यावेळी श्री. दांडेगावकर, आमदार  रोहित पवार यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या योगेश असोबा यांनी संपादित केलेल्या ‘आरोग्यदूत महाराष्ट्राचा’  या गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

पोकरा अंतर्गत वेअर हाऊसचे उदघाटन, प्रकल्पांना भेट

पाथरवाला येथील ऊस संशोधन व विकास प्रक्षेत्र केंद्राची पाहणी

May be an image of 11 people, people sitting and people standing

     मराठवाड्यातील अनेक तरुण शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत, ही आनंदाची बाब असून सर्वच तरुण शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून उत्तम शेती करून शेती व्यवसाय समृद्ध करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्हा जालना अंतर्गत अंबड तालुक्यातील शेवगा येथील विघ्नेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वेअर हाऊसचे उद्घाटन श्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे, कृषी सचिव एकनाथ डवले, पोखराचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमानंतर श्री. पवार यांनी अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्हा जालना अंतर्गत उभारण्यात आलेल्या औजार बँक, शेडनेट, सामूहिक शेततळ्याची पाहणी  केली. यावेळी त्यांनी   लाभार्थ्यांशी संवाद साधला.

     या भेटी नंतर श्री. पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील ऊस संशोधन व विकास प्रक्षेत्र केंद्राच्या विकास कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री राजेश टोपे, वेस्ट इंडियन शुगर मिल्सचे अध्यक्ष बी.बी. ठोबरे,  राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार सर्वश्री रोहित पवार, सतीश चव्हाण, विक्रम काळे आदी उपस्थित होते.

     श्री. शरद पवार यावेळी म्हणाले की, मराठवाडयात ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. पर्यायाने साखर कारखानदारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उसाचे उत्तम बेणाची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणाऱ्या कुशल प्रशिक्षीत कामगाराच्या उपलब्धतेकरीता पाथरवाला येथे ऊस संशोधन व विकास प्रक्षेत्र केंद्र स्थापन करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी ऊसाचे संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. याचा लाभ मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल.