कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा वैजापूर दौरा ; शेताच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

वैजापूर,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून  वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा.  शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. वैजापूर तालुक्यातील भगगाव, लाडगाव , नांदूरढोक, कापूसवाडगांव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गटविकास अधिकारी श्री. हरकळ, हाजी अकिलसेठ, राजेंद्र पाटील साळुंके, पारस घाटे, दशरथ बनकर, महेश बुणगे, ज्ञानेश्वर टेके, दादा कुंदे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी शासनाला चुकीची माहिती देत आहेत तर बहुतेक भागात अद्याप पर्यंत पंचनामे झालेले नाही त्यामुळे अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून शासनाने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरसकट अनुदान द्यावे तसेच आनेवारी लावताना शासनाचे निकष व सत्य परिस्थिती पाहून पन्नास टक्क्याच्या आत आणेवारी जाहीर करावी अशी मागणी आज राज्याचे कृषिमंत्री कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली तसेच शेतकऱ्यांच्या स्थानिक अडीअडचणी मांडल्या. चुकीची पध्दतीने पीक पाहणी प्रयोग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश यावेळी मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.