हसन मुश्रीफ आणि कुटुंबाचा १२७ कोटींचा घोटाळा–माजी खा. डॉ. किरीट सोमैय्या

किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार- हसन मुश्रीफ

मुंबई ,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत डॉ. सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

          डॉ. सोमैय्या यांनी सांगितले की मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे.

          निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

          या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा – मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन  कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडीं एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २. ८९ कोटी.

किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले असून सोमय्या यांनी दिशाभूल करत आरोप केल्यामुळे त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचे नाव देखील वाचता येत नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून माझी हवी तिथं खुशाल चौकशी करावी, असे आव्हान देखील मुश्रीफ यांनी दिले.

“राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावी लागतात, कष्ट करावे लागतात. पण कुणीही यावं आणि डाग लावावा ही परिस्थिती आली आहे. माझ्यावर आधी असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा ठोकणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. मी १७ वर्षे या राज्यात मंत्री आहे. माझ्यावर एक साधा आरोप झाला नाही, चौकशी झाली नाही, कुणी चर्चा केली नाही. भाजपाच्या सत्ताकाळात चिक्की घोटाळा, मुंबईचा गृहनिर्माण घोटाळा असे घोटाळे झाले. माझ्यावर तर कधीच आरोप झाले नाहीत”, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.