मानवी जीवन आणि जागतिक अर्थव्यवस्थेला घातक महामारी असताना बुद्धाचा संदेश एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल, राष्ट्रपतींचे प्रतिपादन

भगवान बुद्धांचा उपदेश अनेक समाज आणि राष्ट्रांना कल्याणाचा मार्ग दाखवणारा – नरेंद्र मोदी

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज आषाढ पौर्णिमेनिमित्त धर्म चक्र दिन समारंभाचे नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनामध्ये उद्घाटन केले. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओच्या माध्यमातून विशेष भाषण झाले. यावेळी मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खलमागिन बाटुल्गा यांनी पाठवलेल्या विशेष संदेशाचे वाचन मंगोलियाचे भारतातले राजदूत गोनचिंग गाबोईड यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमाला संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हादसिंग पटेल आणि अल्पसंख्यांक राज्यमंत्री किरेन रिजीजू उपस्थित होते. त्यांचीही यावेळी भाषणे झाली.

संपूर्ण जगभर कोविड-19 महामारी थैमान घातले आहे. मानवी जीवन आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. अशा संकटाच्या काळात, भगवान बुद्धांचा संदेश दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात केले. लोकांनी आनंद प्राप्त करण्यासाठी लोभ, व्देष, मत्सर आणि असे आपल्यातले अनेक दुर्गुण बाजूला सारले पाहिजेत  असा सल्ला भगवान बुद्धांनी आपल्याला दिला आहे. मात्र प्रत्यक्षात  याउलट लोभ आणि हिंसेच्या मार्गाने जात आहोत. तसेच निसर्गाला अधोगतीकडे नेत आहोत. कोरोना विषाणूची भीती कमी झाल्यानंतर आपल्यासमोर हवामान बदलाचे गंभीर संकट उभे ठाकणार आहे, याची जाणीव आपल्याला आहे. असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्यावतीने आज (दि.4 जुलै,2020) राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आभासी कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद बोलत होते.

भारत ही बौद्ध धर्माची जन्मभूमी आहे, याचा भारताला अभिमान आहे, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, भारतामध्ये भगवान बुद्धांना झालेला साक्षात्कार- ज्ञानप्राप्ती आणि त्यानंतर भगवानांनी चार दशकांपेक्षा जास्त काळ दिलेल्या शिकवणुकीची सांगड भारतीय बौद्धिक उदारता आणि  धार्मिकता यांच्या परंपरेशी घातली जाते. तसेच त्याविषयी आदर बाळगण्याची परंपराही भारतात आहे. आधुनिक काळामध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन महनीय भारतीयांनी भगवान बुद्धांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेवूनच या राष्ट्राच्या भविष्याच्या जडण-घडणीचे कार्य केले.

राष्ट्रपती पुढे म्हणाले की, भगवान बुद्धांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या शिकवणुकीच्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या जगामध्ये सर्वांना कमी अधिक काळापर्यंत दुःखं सोसावे लागते, जीवनात येत असलेल्या अनेक समस्यांमुळे अनेक राजे आणि महान व्यक्तींनीही अतिशय नैराश्याने ग्रासून टाकल्याचा अनुभव घेतला आहे. अशावेळी योग्य मार्ग दाखवणा-या बुद्धाला ते शरण गेले आहेत, अशा अनेक कथा आहेत. कोणामध्ये पूर्णता नाही, त्यामुळे अपूर्णतेच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी बुद्धांच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवला पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओव्दारे केलेल्या भाषणातून गुरू पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणा-या आषाढ पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि भगवान बुद्धांना आदरांजली वाहिली. मंगोलियाच्या कंजूरच्या प्रती मंगोलिया सरकारला सादर करण्यात येत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी दाखवलेले आठ मार्ग यांचे स्मरण केले. बुद्धांची शिकवणूक अनेक समाज आणि राष्ट्रांना कल्याणाचा मार्ग दाखवते. बौद्ध धर्म महिला, गरीब, तसेच सर्व लोकांचा आदर करणे, शांतता आणि अहिंसेची शिकवण देतो. ही शिकवण या भूमीवर शाश्वत आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. भगवान बुद्धांनी आशा आणि उद्देश यांच्याबद्दलही विचार मांडले आहेत आणि या दोन्हीमध्ये अतिशय मजबूत धागा दिसून येतो, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. एकविसाव्या शतकामध्ये आपण कशा प्रकारे आशावादी आहोत आणि ही आशा युवावर्गाकडून प्रफुल्लित व्हावी, असेही आपल्याला वाटते, असे सांगून पंतप्रधानांनी भारत सर्वात मोठी ‘स्टार्ट-अप’ अर्थव्यवस्था आहे, हे अधोरेखित केले.  आपल्या देशातले प्रतिभावान तरूण, तडफदार युवा नागरिक- वैश्विक समस्यांवर तोडगा शोधून काढू शकतील, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमामध्ये केंद्रीय संस्कृती मंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हादसिंग पटेल यांचेही भाषण झाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचे कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, भगवान बुद्धांच्या विचारांनी भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत. आजच्या घडीला त्यांचा संदेश म्हणजे संपूर्ण जगासाठी अंधारात चमकणा-या प्रकाशाचा किरण आहे. संस्कृती मंत्रालयाने मंगोलियन कंजूरच्या प्रती परदेशात सादर केल्या आहेत. यावेळी पटेल यांनी कंजूरच्या प्रती राष्ट्रपती आणि मंगोलियाचे राजदूत गोनचिंग गन्बॉईड यांना सादर केल्या. संस्कृती मंत्रालयाने या प्रती मंगोलियामधल्या सर्व मठांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले. ‘कंजूर’मध्ये 108 विभाग आहेत. आम्ही पाच खंड मुद्रित करीत आहोत. मात्र भविष्यात सर्व 108 खंड मुद्रित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

मंगोलियन कंजूर या 108 खंडातला बौद्ध मजकूर हा मंगोलियामध्ये सर्वात महत्वाचा आणि धार्मिक मजकूर मानला जातो. तसेच ‘कंजूर’चा अतिशय आदर मंगोलियामध्ये केला जातो. कंजूर याचा अर्थ भगवान बुध्दांचे शब्द  म्हणजेच ‘संक्षिप्त आदेश’ असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे प्राध्यापक लोकेशचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हस्तलिखित अभियानाअंतर्गत या मंगोलियन कंजूरचे पुनर्मुद्रण केले जात आहे.

अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजीजू यावेळी म्हणाले की, संस्कृतमध्ये धर्म चक्र आणि परिवर्तन सूत्र म्हणजे धर्माच्या चक्राने केलेले परिवर्तन आहे, असे मानतात. यामध्ये चार त्रिकाल सत्य आणि महान अष्ट मार्गांचा समावेश आहे. बौद्ध धर्माची मूल्ये आणि शिकवण भारताची नीति आणि सांस्कृतिक अस्मिता म्हणून ओळखली जातात, असे सांगून रिजीजू पुढे म्हणाले, आपल्या महान भूमीचा ऐतिहासिक वारसा  म्हणजे बुद्धांना झालेला साक्षात्कार आहे, त्यामुळेच तर प्रत्येकाने बौद्ध धर्म जाणून घेवून त्याचे अनुसरण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाविषयी प्रेम, करूणा दाखवून बुद्ध विचार सर्वांना जोडणारा आहे. सर्वांना घट्ट बांधून ठेवणारी शिकवण भगवान बुद्धांनी आपल्याला दिली आहे. बौद्ध विचारानुसार चंद्र म्हणजे सत्य आणि साक्षात्काराचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणूनच आषाढ पौर्णिमा या पूर्ण चंद्राच्या उपस्थितीचा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. सध्याचा काळ अतिशय कठोर परीक्षेचा आहे, अशावेळी आपण सर्वांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आणि सर्वांना समृद्धी लाभावी यासाठी भगवान बुद्धांच्या शिकवणुकीनुसार कार्य केले पाहिजे, असे मनोगत किरेन रिजीजू यांनी यावेळी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या धर्म चक्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी दि. 7 ते 16 मे, 2020 या कालावधीमध्ये आभासी वेसाक आणि वैश्विक प्रार्थना सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बौद्ध संघाचे ज्येष्ठ गुरू, विचारवंत, जगभरातल्या विविध बौद्ध संघटना सहभागी होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *