शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

‘महाआवास’ योजनेत राज्यात पाच लाख घरकुले पूर्ण, तीन लाख घरकुलांचे काम प्रगतिपथावर

शिर्डी,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- “जिल्हा परिषद शाळा हे ज्ञान मंदिरे आहेत. या शाळांच्या माध्यमातून गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी”, अशा शब्दात राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी  शिक्षकांना मार्गदर्शन केले.

‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामधील कोल्हा-भगवतीपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत व व्यापारी संकुल इमारतीचे भुमिपूजन  राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 7 सप्टेंबर,2021 रोजी झाले  त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद सदस्या शालिनी  विखे पाटील, राहाता तालुका पंचायत समिती सभापती नंदा तांबे,  शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व आण्णासाहेब म्हस्के यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले, ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्वावर शाळांचा विकास करणे, ही नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. अशा विकासकांना स्थानिक गावकऱ्यांनी सहकार्य करावे. प्रत्येक गरीब माणसाच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. येत्या काही वर्षात ‘महाआवास’ योजनेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांसाठी साडेआठ लाख घरकुले बांधण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार घरकुले आतापर्यंत बांधून पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित 3 लाख घरकुले प्रगतीपथावर आहेत.

घरकुलासाठी असलेल्या ‘ड’ यादीमधील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे प्राधान्याने काम करण्यात येईल असेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले. दिल्ली शासनाने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन केली असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’या तत्वावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे या परिसराच्या लौकीकात भर पडणार आहे. कोल्हार-भगवतीपूर जिल्हापरिषद शाळेला मोठा इतिहास आहे. 1956 मध्ये प्रथम येथे प्राथमिक शाळा सुरू झाली. 1963 मध्ये  तत्कालिक मुख्यमंत्र्यांनी या शाळेचे उद्घाटन केले. जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होत असून या शाळांची पट संख्या  वाढत आहे. हे सर्व  शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे असे गौरवोद्गार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी काढले.

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत  शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. तसेच ‘महाआवास अभियान’ (ग्रामीण) मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या डो-हाळे ग्रामपंचायत, रमाई आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत राज्य आवास योजनेसाठी धनगरवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुले योजनेमध्ये लोणी बुद्रुक येथील विनोद भाऊसाहेब पारखे, रमाई आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुलासाठी लोणी बुद्रुक येथील कमल गंगाधर बोरसे यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लोणी खुर्द येथील आवास योजना, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत वाकडी ग्राम पंचायत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लोणी बुद्रुक येथील सिंधुताई आदिवासी निवारा गृहनिर्माण संस्थेला सर्वोत्कृष्ट गृहसंकुल म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक कर्मचाऱ्यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.