देशात 95 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी,रुग्ण बरे होण्याचा दर 60.18 %
नवी दिल्ली, 4 जुलै 2020
बरे होणाऱ्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या एकत्रित आणि केंद्रित प्रयत्नांमुळे आतापर्यंत, कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत 1,58,793 रुग्ण बरे झाले आहेत. याचा परिणाम म्हणजे, रुग्ण बरे होण्याच्या दरात वृद्धी होऊन तो 60.18 % झाला आहे.


गेल्या 24 तासांत, एकूण 14,335 कोविड-19 रुग्ण बरे झाले असून, आता बरे झालेल्या रुग्णांचा एकत्रित आकडा 3,94,226 वर पोहोचला आहे.सध्या 2,35,433 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.देशातील चाचणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तृत करण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. देशात सध्या 1087 प्रयोगशाळा आहेत; यामध्ये शासकीय क्षेत्रातील 780 प्रयोगशाळा आणि 307 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
• रियल टाईम –आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 584 (सरकारी: 366 + खाजगी: 218)
• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 412 (सरकारी : 381 + खाजगी: 31)
• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 91 (सरकारी: 33 + खाजगी: 58)
“चाचणी, रुग्ण शोध, उपचार” धोरणाचा भाग म्हणून घेतलेल्या अनेक लोक-केंद्रित उपायांमुळे कोविड-19 चाचणीतील अनेक अडथळे दूर झाले आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणी सुविधा उपलब्ध केल्यामुळे दररोज चाचणी घेतल्या गेलेल्या नमुन्यांमध्ये निरंतर वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,42,383 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून, एकूण चाचण्यांची संख्या 95,40,132 इतकी झाली आहे.
कोविड-19 साठी क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अद्ययावत केले आहे.