भिवगाव येथे क्रेनसह चालक विहिरीत पडला चालकाचा मृत्यू ; सुदैवाने चार मजूर बचावले

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- भिवगाव येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेनचे वायर रोप तूटल्याने क्रेनसह चालक विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. जनार्दन ऊर्फ रविंद्र सुधाकर पवार (वय 32 रा बोरसर ता. वैजापूर) असे मृतांचे नाव आहे. दरम्यान या अपघातात विहिरीत काम करणारे चार कामगार सुदैवाने बचावले आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रवींद्र पवार यांची भिवगाव शिवरात गट क्रमांक 62 मध्ये शेती आहे, त्याच्या शेतात विहिरीचे काम स्वतःच्या क्रेनने सुरू होते, व तेच क्रेन चालवत होते,रविवारी दुपारच्या सुमारास काम सुरू असताना अचानक क्रेनचे वायररोप तुटले व ते क्रेन सहित विहिरीत पडले.क्रेन 25 फूट विहरीत पडत अडकले मात्र रवींद्र हे विहिरीत तळात 65 फूट खाली पडले व त्यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला,हा अपघात जेव्हा झाला तेव्हा चौघे मजूर हे विहारात काम करत होते,क्रेन विहिरीत अडकल्याने चौघांचा जीव सुदैवाने बचावला,त्यांना नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले व पोलिसांना घटनेची माहिती दिली, वैजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक घाडके,पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख,योगेश झाल्टे,पोलिस कॉन्स्टेबल पडवळ यांनी घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांच्या मदतीने हायड्रा क्रेनच्या सहाय्याने  क्रेन बाहेर काढून रवींद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला,रविद्रा यांच्यावर सायंकाळी साडेसहा वाजता बोरसर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी रवींद्र यांचे चुलत भाऊ भावराव पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.