महागाईची झळ कमी होऊ दे:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे गणरायाला साकडे

औरंगाबाद,३१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे बळीराजाला लवकर मदत मिळू दे, जीवनावश्यक वस्तूंवर लागलेल्या जीएसटीमुळे वाढलेली महागाई कमी होऊ दे, तसेच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्यास केंद्राला सद्बुद्धी मिळू दे असे साकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गणरायाला घातले आहे. आज येथील त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब त्यांनी”श्री गणेशाची” प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

माध्यम प्रतिनिधींनीसर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणं योग्य नसल्याचे दानवे यांनी म्हटले. मात्र न्यायाची अपेक्षा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे सालस नेतृत्व राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभले होते. मात्र काही लोकांना दुर्बुद्धी आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून बाजूला व्हावं लागलं. असं असलं तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही नगण्य असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या केली. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यकाळात केलेल्या कार्याची दखल देशाने घेतली आहे. त्यामुळे यापुढे देशाला त्यांचं नेतृत्वाच स्पर्श व्हावं व देशात हिंदुत्वाचा झंझावात येऊ दे असे म्हणत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असे म्हटले आहे.       

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांत गणोशोत्सवाचा उत्साह मोठया प्रमाणात दिसला नाही. मात्र राज्यात राजकीय स्थिती प्रदूषित असली तरउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामामुळे यंदा राज्यातील आरोग्य स्थिती सुधारल्याचे म्हणत दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.